निरव म्हणजे माझा मुलगा. निरवच्या मम्मी ने त्याला कायम सांगितले होते पप्पा तुला सोडून ट्रेकला जातात. मग तो रोज मला म्हणत होता पप्पा ट्रेकला जाऊया ? जंगलात जाऊया ?. फक्त २ वर्षाचा चिमुरडा त्याला ट्रेक म्हणजे काय माहित नाही पण डिस्कव्हरी चॅनेल पाहून त्याला डोंगर, जंगल, प्राणी असे बरीच आवड निर्माण झाली होते, पण प्रत्येक्षात कधी पाहिले नाही.
म्हणुन मग आम्ही एक दिवस ठरवला व सकाळी ८:०० वाजता घरातून डबा सोबत घेऊन, निरवला ट्रेकला व जंगलात जाऊया असे सांगून निघालो. त्या नंतर आम्ही गाडी थांबवली ती थेट लोणावळा येथे नाष्टासाठी. गाडी थांबवताच निरव विचारू लागला "ट्रेक कुठे आहे"?.
मी म्हणालो थोडे थांब आपण नाष्टा करून जाऊया. त्या नंतर आम्ही लोणावळा येथून पुढे निघालो व तेथील लायन्स पॉईंट येथे थोडे थांबून निरवला घेऊन घोडेस्वारी केली. सुरवातीला तो घोड्यावरती बसायला घाबरत होता नंतर मात्र त्याला खूप आनंद झाला.
त्यानंतर कोरीगड कडे जातांना हिरवागार चापडा साप आडवा आला. त्याला पाहताच निरव साप साप असे बोलू लागला. पेठ शहापूर या पायथाच्या गावी गाडी लावून कोरीगडच्या दिशेने चालायला सुरवात केली. गडाच्या दिशेन बोट करून निरवला सांगितले आपल्याला तिथे पर्यंत जायचे आहे. निरवने डोके वर करून गडाकडे पाहताच, किल्ल्या वरील भगव्या झेंड्याने त्याचे लक्ष वेधले.
गडावरती जातांना घनदाट जंगल दाखवत व मध्ये मध्ये निरवला उचलून घेत आम्ही पायऱ्यांच्या वाटेपाशी येऊन पोहचलो. मग निरव १ २ ३ असे एक एक पायऱ्या मोजत वर चढू लागला. मध्येच माकडे दर्शन देत होती. थोड्याच वेळात दगडामध्ये असलेले गणेश मंदिर व गुहा जवळ पोहचलो. तेथे थोडी विश्रांती घेऊन पुन्हा पुढे चालू लागलो. तेथे एक लहान गुहा व त्यातील पाण्याचे टाके निरवला दाखवले. परत थोडे पुढे पायऱ्या चढून जाताच आणखीन एक गुहा लागली तिथे काही पाहण्यासारखे नाही म्हणून मी दुर्लक्ष करत होतो पण निरव ऐकेल तरी कसा. म्हणाला मला पाहायचेच आहे, मग ती गुहा दाखवली. अश्या प्रकारे पायऱ्यां संपवून आम्ही पहिल्या मुख्य दरवाजा पाशी पोहचलो.
|
कोरीगडची जंगलातील वाट |
|
कोरीगड वरील पायऱ्यांची वाट |
|
कोरीगड वरील पायऱ्यांचा वाटेवरती असलेले गणेश मंदिर |
|
कोरीगडचा मुख्य गणेश दरवाजा |
मुख्य दरवाजातून थोडे पुढे चालून जाताच समोर असलेल्या शंकर मंदिरातील शिवलिंग व नंदीला नमस्कार करून मंदिराच्या अंगणात असलेल्या तोफा पाहिल्या. गडाच्या एका बाजूने गड व आजूबाजूचा परिसर पाहत गडाचा फेरा चालू केला व जो झेंडा खालून दिसत होता तेथे येऊन पोहचलो. निरवला सांगितले हाच तो खालून दिसलेला झेंडा. तसेच मंदिराच्या मागे असलेले तलाव पाहिले. तिथेच असलेली गडावरील मोठी लक्ष्मी तोफ पाहिली. कोराईमातेच्या मंदिरामध्ये जेवण उरकले आणि निरवला ट्रेक कशाला म्हणतात ते समजावले. |
कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील नंदी व तोफा |
|
कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा |
|
कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा |
|
कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा |
|
कोरीगड वरील पाण्याचा तलाव |
|
कोरीगडावरील सर्वात मोठी लक्ष्मी तोफ
विश्रांती नंतर परत पुढे दिसत असलेल्या आणखीन एक तोफ व बुरुजाकडे निघालो, निरव मात्र मध्येच असलेल्या लहानश्या साचलेल्या पाण्या जवळ बसून त्यामध्ये लहान दगड टाकु लागला त्याला ते बरे वाटू लागले. तो पुढे जाऊया चल, बोल्या नंतर यायला नकार देऊ लागला मग मी पण थोडे लहान होऊन त्याच्या सोबत खेळू लागलो. पुढे असलेले वाड्यांचे अवशेष पाहिले व गड उतरायला सुरवात केली. पूर्ण गड पालथा घातल्याने तो थकून गेला मग मात्र त्याने उचलून घेण्यासाठी सांगितले त्यातच त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याला खांद्यावरती झोपवून घेऊन पूर्ण गड खाली उतरलो. "अश्या प्रकारे निरवने ट्रेकचा श्रीगणेश केला" |
|
कोरीगड वरील कोराईमाता मंदिर |
©सुशील राजगोळकर