Showing posts with label Korigad. Show all posts
Showing posts with label Korigad. Show all posts

कोरीगड (कोराईगड) "निरव"चा पहिला ट्रेक KORIGAD (KORAIGAD)

निरव म्हणजे माझा मुलगा. निरवच्या मम्मी ने त्याला कायम सांगितले होते पप्पा तुला सोडून ट्रेकला जातात. मग तो रोज मला म्हणत होता पप्पा ट्रेकला जाऊया ? जंगलात जाऊया ?. फक्त २ वर्षाचा चिमुरडा त्याला ट्रेक म्हणजे काय माहित नाही पण डिस्कव्हरी चॅनेल पाहून त्याला डोंगर, जंगल, प्राणी असे बरीच आवड निर्माण झाली होते, पण प्रत्येक्षात कधी पाहिले नाही.
म्हणुन मग आम्ही एक दिवस ठरवला व सकाळी ८:०० वाजता घरातून डबा सोबत घेऊन, निरवला ट्रेकला व जंगलात जाऊया असे सांगून निघालो. त्या नंतर आम्ही गाडी थांबवली ती थेट लोणावळा येथे नाष्टासाठी. गाडी थांबवताच निरव विचारू लागला "ट्रेक कुठे आहे"?.
मी म्हणालो थोडे थांब आपण नाष्टा करून जाऊया. त्या नंतर आम्ही लोणावळा येथून पुढे निघालो व तेथील लायन्स पॉईंट येथे थोडे थांबून निरवला घेऊन घोडेस्वारी केली. सुरवातीला तो घोड्यावरती बसायला घाबरत होता नंतर मात्र त्याला खूप आनंद झाला.


त्यानंतर कोरीगड कडे जातांना हिरवागार चापडा साप आडवा आला. त्याला पाहताच निरव साप साप असे बोलू लागला. पेठ शहापूर या पायथाच्या गावी गाडी लावून कोरीगडच्या दिशेने चालायला सुरवात केली. गडाच्या दिशेन बोट करून निरवला सांगितले आपल्याला तिथे पर्यंत जायचे आहे. निरवने डोके वर करून गडाकडे पाहताच, किल्ल्या वरील भगव्या झेंड्याने त्याचे लक्ष वेधले.


गडावरती जातांना घनदाट जंगल दाखवत व मध्ये मध्ये निरवला उचलून घेत आम्ही पायऱ्यांच्या वाटेपाशी येऊन पोहचलो. मग निरव १ २ ३ असे एक एक पायऱ्या मोजत वर चढू लागला. मध्येच माकडे दर्शन देत होती. थोड्याच वेळात दगडामध्ये असलेले गणेश मंदिर व गुहा जवळ पोहचलो. तेथे थोडी विश्रांती घेऊन पुन्हा पुढे चालू लागलो. तेथे एक लहान गुहा व त्यातील पाण्याचे टाके निरवला दाखवले. परत थोडे पुढे पायऱ्या चढून जाताच आणखीन एक गुहा लागली तिथे काही पाहण्यासारखे नाही म्हणून मी दुर्लक्ष करत होतो पण निरव ऐकेल तरी कसा. म्हणाला मला पाहायचेच आहे, मग ती गुहा दाखवली. अश्या प्रकारे पायऱ्यां संपवून आम्ही पहिल्या मुख्य दरवाजा पाशी पोहचलो.

कोरीगडची जंगलातील वाट

कोरीगडची जंगलातील वाट 

कोरीगड वरील पायऱ्यांची वाट

कोरीगड वरील पायऱ्यांची वाट 


कोरीगड वरील पायऱ्यांचा वाटेवरती असलेले गणेश मंदिर

कोरीगड वरील पायऱ्यांचा वाटेवरती असलेले गणेश मंदिर 

कोरीगडचा मुख्य गणेश दरवाजा

कोरीगडचा मुख्य गणेश दरवाजा 


मुख्य दरवाजातून थोडे पुढे चालून जाताच समोर असलेल्या शंकर मंदिरातील शिवलिंग व नंदीला नमस्कार करून मंदिराच्या अंगणात असलेल्या तोफा पाहिल्या. गडाच्या एका बाजूने गड व आजूबाजूचा परिसर पाहत गडाचा फेरा चालू केला व जो झेंडा खालून दिसत होता तेथे येऊन पोहचलो. निरवला सांगितले हाच तो खालून दिसलेला झेंडा. तसेच मंदिराच्या मागे असलेले तलाव पाहिले. तिथेच असलेली गडावरील मोठी लक्ष्मी तोफ पाहिली. कोराईमातेच्या मंदिरामध्ये जेवण उरकले आणि निरवला ट्रेक कशाला म्हणतात ते समजावले.
कोरीगडावरील महादेव मंदिर समोरील नंदी व तोफा
कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील नंदी व तोफा 
कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा

कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा 

कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा
कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा 
कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा
कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा 
कोरीगड वरील पाण्याचा तलाव
कोरीगड वरील पाण्याचा तलाव
कोरीगडावरील सर्वात मोठी लक्ष्मी तोफ
कोरीगडावरील सर्वात मोठी लक्ष्मी तोफ 

विश्रांती नंतर परत पुढे दिसत असलेल्या आणखीन एक तोफ व बुरुजाकडे निघालो, निरव मात्र मध्येच असलेल्या लहानश्या साचलेल्या पाण्या जवळ बसून त्यामध्ये लहान दगड टाकु लागला त्याला ते बरे वाटू लागले. तो पुढे जाऊया चल, बोल्या नंतर यायला नकार देऊ लागला मग मी पण थोडे लहान होऊन त्याच्या सोबत खेळू लागलो. पुढे असलेले वाड्यांचे अवशेष पाहिले व गड उतरायला सुरवात केली. पूर्ण गड पालथा घातल्याने तो थकून गेला मग मात्र त्याने उचलून घेण्यासाठी सांगितले त्यातच त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याला खांद्यावरती झोपवून घेऊन पूर्ण गड खाली उतरलो. "अश्या प्रकारे निरवने ट्रेकचा श्रीगणेश केला"

कोरीगड वरील कोराईमाता मंदिर
कोरीगड वरील कोराईमाता मंदिर 


©सुशील राजगोळकर

तुंग (कठीणगड) TUNG

०४ ऑगस्ट २०१८ रोजी ठरल्याप्रमाणे मी दुचाकी घेऊन सकाळचे ०८:०० वाजता किवळे, रावेतहून लोणावळाकडे निघालो. व ०९:१० वाजता छञपती शिवाजी महाराज चौक लोणावळा येथे पोहचलो. माझे काही मित्र मुंबईहून येणार होते ते ही १०:२० पोहचले. मग एकत्र नाष्टा करून किल्ले तुंग कडे रवाना झालो. 
लोणावळा आणि त्यातून पावसाळा म्हटले कि पाऊस व दाट धुके हे आलेच...! त्याच धुक्यातून सावकाश गाडी चालवत आम्ही ११:४५ ला तुंग किल्ल्यापाशी पोहचलो. पायथ्याला मारुती मंदिर आहे तेथे गाडी लावून गड चढायला सुरवात केली. पावसाची रिपरिप चालूच होती. थोडेसे वरती चढुन जाताच डाव्या बाजूला एक मारुती मंदिर लागले, त्याला नमस्कार करून आणखीन थोडे पुढे जाता उजव्या हाताला एक पाण्याचे टाके व गुहा लागली. ती पाहून पुढे जाताच पहिला मुख्य दरवाजा लागला. तेथून आत शिरताच एक सरळ वाट पुढे माचीकडे जाते व एक वाट गड माथ्यावरती जाते. वरती चढून येताच उजव्या बाजूला सदरेचे अवशेष पाहायला मिळाले तेथेच एक गणपती मंदिर व पाण्याचे मोठे कुंड आहे. त्या कुंडाचा डाव्या बाजूने पुढे जाता बाले किल्ल्याचा चढणीचा आधी उजव्या हाताला एक स्वच्छ नितळ पाण्याचे टाके आहे, ते पाहून तिथून परत माघारी आलो. व बालेकिल्ला चढायला सुरवात केली. या गडचा माथा लहान आहे त्यामुळे तुंग किल्ला हा टेहळणी साठी वापरला जायचा. बालेकिल्यावर तुंग देवीचे मंदिर आहे तिथे देवीचे दर्शन घेतले व थोडे थांबुन किल्ला उतरायला सुरवात केली. या किल्ल्यावरून तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्ले व पवन मावळ हा सर्व परिसर दिसतो पण यावेळी दाट धुक्यामुळे आम्हाला ते दिसू शकले नाही. साधारण ०२:१५ वाजता आम्ही किल्ला उतरून खाली पोहचलो व तेथेच जेवण करून लगोलग कोरीगड (कोराईगड) पाहायला निघालो.

©सुशील राजगोळकर














कोरीगड (कोराईगड) Korigad (Koraigad)

०४ ऑगस्ट २०१८ रोजी तुंग किल्ला पाहूण आंबवणे (पेठ शहापूर ) येथे पोहचायला आम्हाला ३:४० वाजले होते. तेथेच गाडी लावली व वेळ न-दवडता गडाचा दिशेने चालू लागलो १० ते १५ मिनिटांचा पायपिटी नंतर आम्ही पायऱ्यांपाशी पोहचलो. गडावरती जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत, थोडया पायरी चढून वरती येताच दगडा मध्ये कोरलेले गणपती मंदिर व गुप्त गुहा आहे ते पाहुन पुढे चालू लागलो. पायऱ्यांवरून मस्तअसे पावसाचे पाणी वाहत होते, त्याच वाहत्या पाण्यातून आम्ही एक एक पायऱ्या चढत होतो. थोडे वरती येता उजव्या हाताला लहानशी गूहा आहे ते पाहून आणखीन पुढे जाताच डाव्या हाताला एक मोठी गुहा आहे तेथून थोडे पुढे जाता गडाचा मुख्य गणेश दरवाजा लागला, हा दरवाजा भव्य मोठा आहे. दरवाजा अता नवीन बसवलेला आहे. पुढे गडावरती पोहचताच उजव्या बाजूला समोरच शिव शंकराचे मंदिर व मंदिराचा अंगणात ठेवलेल्या ४ तोफा पाहायला मिळाल्या. शंकर मंदिराचा मागे दोन मोठे तलाव पाहायला मिळाले. गडावरती शिरताच गडाचा डाव्या बाजूला जातांना खूप असे वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. ते पाहत पुढे जाता कोराईमातेचे मंदिर आहे मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. मंदिरा समोर दीपमाळ व तुळशी वृंदावन आहे. मंदिरा पासून पुढे जाता एक बुरुज आहे व तिथे एक तोफ आहे ती पाहायला मिळाली. तसेच मंदिराचा मागे किल्ल्या वरील मोठी 'लक्ष्मी तोफ' पाहायला मिळाली. किल्याला चोहो बाजूने मजबूत अशी तटबंधी आहे, याच तटबंधी वरून संपूर्ण किल्य्याला फेरफटका मारता येऊ शकतो पण दाट धुक्यात किल्ला झाकला गेला होता, काही ठिकाणी तटबंधीहुन पाहण्याचा प्रयत्न केला पण खाली धुक्या वैतिरिक्त काहीच नाही, त्यामुळे आम्ही सावधगिरी म्हणून थोडे तटबंधीचा बाजूनेच पाहणे सोईस्कर समजले. पूर्ण गडाला फेरी मारून आम्ही लगबगीने गड उतरला, गावामध्ये पोहचताच जोराचा पाऊस चालू झाला. एव्हाना संध्याकाळचे ६:१५ वाजले होते अजितला मुंबई व मला पुणे गाठायाचे होते म्हणून आम्ही त्याच भर पाऊसात सावकाश गाडी चालवत लोणावळा गाठले व एक मेकाचा निरोप घेतला व आप-आपल्या मार्गी निघालो.
©सुशील राजगोळकर











"घनगड" ⛰️ निरवचा ५० व्या किल्याची भटकंती. 🚗⛰️ | Ghangad & Tailbailla - Lonavala 11-January-2026

मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.