०४ ऑगस्ट २०१८ रोजी तुंग किल्ला पाहूण आंबवणे (पेठ शहापूर ) येथे पोहचायला आम्हाला ३:४० वाजले होते. तेथेच गाडी लावली व वेळ न-दवडता गडाचा दिशेने चालू लागलो १० ते १५ मिनिटांचा पायपिटी नंतर आम्ही पायऱ्यांपाशी पोहचलो. गडावरती जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत, थोडया पायरी चढून वरती येताच दगडा मध्ये कोरलेले गणपती मंदिर व गुप्त गुहा आहे ते पाहुन पुढे चालू लागलो. पायऱ्यांवरून मस्तअसे पावसाचे पाणी वाहत होते, त्याच वाहत्या पाण्यातून आम्ही एक एक पायऱ्या चढत होतो. थोडे वरती येता उजव्या हाताला लहानशी गूहा आहे ते पाहून आणखीन पुढे जाताच डाव्या हाताला एक मोठी गुहा आहे तेथून थोडे पुढे जाता गडाचा मुख्य गणेश दरवाजा लागला, हा दरवाजा भव्य मोठा आहे. दरवाजा अता नवीन बसवलेला आहे. पुढे गडावरती पोहचताच उजव्या बाजूला समोरच शिव शंकराचे मंदिर व मंदिराचा अंगणात ठेवलेल्या ४ तोफा पाहायला मिळाल्या. शंकर मंदिराचा मागे दोन मोठे तलाव पाहायला मिळाले. गडावरती शिरताच गडाचा डाव्या बाजूला जातांना खूप असे वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. ते पाहत पुढे जाता कोराईमातेचे मंदिर आहे मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. मंदिरा समोर दीपमाळ व तुळशी वृंदावन आहे. मंदिरा पासून पुढे जाता एक बुरुज आहे व तिथे एक तोफ आहे ती पाहायला मिळाली. तसेच मंदिराचा मागे किल्ल्या वरील मोठी 'लक्ष्मी तोफ' पाहायला मिळाली. किल्याला चोहो बाजूने मजबूत अशी तटबंधी आहे, याच तटबंधी वरून संपूर्ण किल्य्याला फेरफटका मारता येऊ शकतो पण दाट धुक्यात किल्ला झाकला गेला होता, काही ठिकाणी तटबंधीहुन पाहण्याचा प्रयत्न केला पण खाली धुक्या वैतिरिक्त काहीच नाही, त्यामुळे आम्ही सावधगिरी म्हणून थोडे तटबंधीचा बाजूनेच पाहणे सोईस्कर समजले. पूर्ण गडाला फेरी मारून आम्ही लगबगीने गड उतरला, गावामध्ये पोहचताच जोराचा पाऊस चालू झाला. एव्हाना संध्याकाळचे ६:१५ वाजले होते अजितला मुंबई व मला पुणे गाठायाचे होते म्हणून आम्ही त्याच भर पाऊसात सावकाश गाडी चालवत लोणावळा गाठले व एक मेकाचा निरोप घेतला व आप-आपल्या मार्गी निघालो.
©सुशील राजगोळकर
No comments:
Post a Comment