०४ ऑगस्ट २०१८ रोजी ठरल्याप्रमाणे मी दुचाकी घेऊन सकाळचे ०८:०० वाजता किवळे, रावेतहून लोणावळाकडे निघालो. व ०९:१० वाजता छञपती शिवाजी महाराज चौक लोणावळा येथे पोहचलो. माझे काही मित्र मुंबईहून येणार होते ते ही १०:२० पोहचले. मग एकत्र नाष्टा करून किल्ले तुंग कडे रवाना झालो.
लोणावळा आणि त्यातून पावसाळा म्हटले कि पाऊस व दाट धुके हे आलेच...! त्याच धुक्यातून सावकाश गाडी चालवत आम्ही ११:४५ ला तुंग किल्ल्यापाशी पोहचलो. पायथ्याला मारुती मंदिर आहे तेथे गाडी लावून गड चढायला सुरवात केली. पावसाची रिपरिप चालूच होती. थोडेसे वरती चढुन जाताच डाव्या बाजूला एक मारुती मंदिर लागले, त्याला नमस्कार करून आणखीन थोडे पुढे जाता उजव्या हाताला एक पाण्याचे टाके व गुहा लागली. ती पाहून पुढे जाताच पहिला मुख्य दरवाजा लागला. तेथून आत शिरताच एक सरळ वाट पुढे माचीकडे जाते व एक वाट गड माथ्यावरती जाते. वरती चढून येताच उजव्या बाजूला सदरेचे अवशेष पाहायला मिळाले तेथेच एक गणपती मंदिर व पाण्याचे मोठे कुंड आहे. त्या कुंडाचा डाव्या बाजूने पुढे जाता बाले किल्ल्याचा चढणीचा आधी उजव्या हाताला एक स्वच्छ नितळ पाण्याचे टाके आहे, ते पाहून तिथून परत माघारी आलो. व बालेकिल्ला चढायला सुरवात केली. या गडचा माथा लहान आहे त्यामुळे तुंग किल्ला हा टेहळणी साठी वापरला जायचा. बालेकिल्यावर तुंग देवीचे मंदिर आहे तिथे देवीचे दर्शन घेतले व थोडे थांबुन किल्ला उतरायला सुरवात केली. या किल्ल्यावरून तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्ले व पवन मावळ हा सर्व परिसर दिसतो पण यावेळी दाट धुक्यामुळे आम्हाला ते दिसू शकले नाही. साधारण ०२:१५ वाजता आम्ही किल्ला उतरून खाली पोहचलो व तेथेच जेवण करून लगोलग कोरीगड (कोराईगड) पाहायला निघालो.
©सुशील राजगोळकर