चौथ्यांदा.... !!! हो बरोबर चौथ्यांदा लोहगड पाहिला. पाय दुःखीमुळे मी थोडे दिवस ट्रेकला ब्रेक दिला होता. लोणावळ्याला डॉक्टर कडेच गेले होतो. पण निरव खूप दिवसा पासून आग्रह करत होता, म्हणून लोहगड पाहायला गेलो.
बरेच जण असा विचार करतात कि परत परत एकचं ठिकाण का पाहायचे ? पण निसर्ग,🌱 सह्याद्री व गडकोट ⛰️ एकदा पाहून पूर्ण होईल व समजेल असे कोणालाच शक्य नाही. म्हणूनच तर आम्ही भटके एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा भेट देत असतो.
अता लोहगडचेच पहा ना. ८ वर्षापूर्वी मी एकटा मळवली स्टेशन पासून पायी चालत ट्रेक केला होतो. तेंव्हा तेथील बाकीचे लोक एकटाच कसा आला असेल ? अशा नजरेने पाहत होते 🚶🏻♂️. पण एकटा फिरण्याची मज्जाच वेगळी...! पण अवघड ठिकाणी कोणती माहिती न घेता एकट्याने ट्रेक करणे खूप चुकीचे ठरू शकते.
असो, तेंव्हा मनाला खूप खंत वाटली होती. कारण त्यावेळी भाजे लेणी ते लोहगड मधील घाटाचा रस्ता नव्हता. लोहगड गांववाले कसे येत जात होते? आता ज्या गडाला पायथ्या पासून दगडी पायऱ्या आहेत त्या देखील नव्हत्या. तसेच तोफा अस्थ व्यस्थ अवस्थेत होत्या. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे यांचे दिशादर्शक फलक देखील लावलेले नव्हते. एकटाच व खूप दमल्यामुळे त्यावेळी मी विंचूकडा लांबूनच नजरेमध्ये सामावून घेतला व पुढील वेळी पाहायला नक्की येणार असे सांगून परतलो.
परत काही वर्षाने दुसऱ्यांदा (२०१५) लोहगड पाहिला. तेंव्हा घाटाचा रस्ता झाला होता तर पायऱ्यांचे काम चालू होते. या वेळी मात्र विंचूकडा आवर्जून पाहिला.
तिसऱ्यांदा (२०२०) एक वर्षभरा पूर्वी ऑफिस मधील सहकाऱ्यांन सोबत आलो होतो या वेळी मात्र घाटाचा रस्ता पूर्ण खराब झाला होता. गाडी देखील चढत न्हवती. मात्र गडाचा पायथ्याला गावकऱ्यांनी शुल्क पार्किंग चालू केले आहे. तसेच पायऱ्यांचे काम पूर्ण झालेले पाहायला मिळाले. व तोफा देखील व्यवस्थित ठेवलेल्या पहायला मिळाल्या.
आता चौथ्यांदा मात्र घाट रस्ता देखील व्यवस्थित होता पण मीच अनफिट व रविवारची लोहगडाची गर्दी यामुळे विसापूर कि लोहगड पाहायचा या संभ्रमात होतो. पण विसापूर किल्ला लोहगड किल्या पेक्षा चढायला थोडा अवघड असल्यामुळे निरवला लोहगड दाखवायचा म्हणून निघालो.
लोहगडाचा पुरातत्व खात्याने पायथ्या पासून बनवलेल्या दगडी पायऱ्यांच निरवल्या भावल्या व तो गडाचा दिशेने धावू लागला. कधी एकदाचा पूर्ण गड पाहतोय असे त्याला वाटत होते.
गडावरती जातांना असलेले गणेश दरवाजा, पाण्याचा टाक्या, हनुमान दरवाजा, तोफा, बुरुज, गडावरून दिसणारे विसापूर किल्ला, तिकोना किल्ला, तुंग किल्ला ⛰️ व पवना धरणाचा जलाशय दाखवत. तर पुढे भगवा ध्वज🚩, हनुमान मंदिर, शिवलिंग, महादेव मंदिर🛕, पाण्याचे टाके व १६ कोणी तलाव असे सर्व काही निरवला दाखवत व समजावून सांगत आम्ही विंचूकडयाच्या दिशेला आलो. यावेळी मात्र निरवने आग्रह करून देखील विंचूकडा लांबूनच पाहिला व पुढील वेळी आपण नक्की जाऊया असे सांगितले व माघारी फिरलो. मात्र यावेळी विशेष म्हणजे या पूर्वी ३ वेळा येऊन देखील पाहायची राहिलेली गडावरील "लक्ष्मी कोठी" पाहिली व मन आणखीनच प्रसन्न झाले.
लोहगड वरील तोफ |
लोहगड वरील महादेव मंदिरातील शिवलिंग |
लोहगड वरील महादेव मंदिर |
लोहगड वरील विंचूकडा (पप्पा तिकडे जाऊया) |
लोहगड वरील "लक्ष्मी कोठी" |
"हीच ती गडकोटांची खासियत पूर्ण गड पाहिला असे वाटते तरी काहींना काही राहून जाते. प्रत्येक वेळी प्रत्येक ऋतूत काहीतरी नवीन पाहायला मिळते किंवा पहिल्या वेळी पाहिलेल्या गोष्टी सुद्धा, दुसऱ्या वेळी वेगळ्याच रूपात पाहायला मिळतात."
आता निरव विंचूकडा व गडावरून पाहायला मिळालेले इतर किल्ले कधी पाहायला मिळणार याची वाट पाहतोय..........!!
©सुशील राजगोळकर
( लोहगड भटकंती ब्लॉग २०२०)
https://susheelrajagolkar.blogspot.com/2020/01/lohgad.html?m=1 https://www.facebook.com/100001088243750/posts/2690823537630561/
⛰️लोहगड १४-मार्च-२०२१⛰️
(Facebook Post - Photo) https://www.facebook.com/100001088243750/posts/3851926631520240/