मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थोडे लिहूया म्हणून हे वर्णन मांडतोय.
२०१९ मध्ये कोरीगड
पासून भटकंती चालू केली, तेंव्हा निरव ०२ वर्षाचा होता. एक एक गड फिरवायला सुरवात केली व हळू हळू त्याला गडदुर्गांची ओठ निर्माण झाली. मग तो सुट्टीचा दिवशी पप्पा ट्रेक ला जाऊया असे सारखे विचारू लागला. तसे आमचे वेळ काढून ट्रेक चालू झाले.
पुढे गडावरती भेटणारे लोक विचारू लागले इतका लहान असून गड चढून आला का? याचे किती किल्ले झालेत? असे त्याला प्रश्न विचारू लागले. मग निरव देखील किल्ले मोजू लागला. सुरवातीला अगदी लहान असताना त्याला इतके लक्षात राहत न्हवते. आता जस जसे फिरायला लागलो तसे त्याला गडावरील अवशेष, गजशिल्प, शरभ शिल्प, चुन्याचा घाणा, शिलालेख, बुरुज, महादरवाजा, तोफ, समाधी, टाके, खांब टाके, बांधीव पायरी व खोदीव पायरी समजायला लागल्या. अवघड पॅच व उंचीची भीती कमी झाली व तशी आमची भटकंती चालू झाली. रायगड, राजगड, शिवनेरी, प्रतापगड, सिंधुदुर्ग, चावंड, कर्नाळा, विसापूर, तिकोना, तुंग, राजमाची अशा किल्यांची भटकंती झाली. आता गडावरती कोणते अवशेष पहायला मिळाले कि असे अवशेष दुसऱ्या कोणत्या किल्या वरती पाहिले ते सांगतो. तसेच दुसऱ्या एख्याद्या किल्या वरील आठवणी आता त्याला लक्षात आहेत व त्या आठवणी सांगतो. येथेच मला आम्ही केलेलया भटकंती सार्थकी लागत आहे असे वाटते.
नोव्हेंबर २०२५ मध्ये निरवची ४९ गड दुर्गांची भटकंती पूर्ण झाली, तेंव्हा पासून तो बोलत होता पप्पा मला ५० किल्ले करायचे आहेत. पण त्याची परीक्षा व इतर कामातून दोन महिन्याचा विश्रांती नंतर घनगड करायचा योग आला.

घनगड

११ जानेवारी २०२६ रोजी अजित व त्याचा मित्र मुंबई वरून गाडी
घेऊन निघाले व मी, निरव व शुभम आम्ही लोकल ट्रेनने लोणावळा गाठले. लोणावळा येथील अन्नपूर्णा हॉटेल मध्ये सकाळचा नाश्ता केला 
व घनगडाचा दिशेने निघालो. १०:३० वाजता एकोले गावामध्ये पोहचलो व घनगडाचा दिशेने चालायला सुरुवात केली. १० मिनिट चालून पुढे आलो तेथे डाव्या बाजूला असलेल्या
शिवलिंग, मंदिर, वीरगळी, अवशेष पाहिले व तेथील शिवलिंगाचे दर्शन घेऊन पुढे निघालो.
 |
| अकोले गावातून घनगड कडे जाताना दिसणारा घनगड |
 |
| महादेव मंदिराचे अवशेष व शिवलिंग - घनगड |
 |
| महादेव मंदिरा जवळ असलेल्या वीरगळी - घनगड |
महादेव मंदिरा पासून थोडे पुढे चालून आल्या नंतर गारजाई मंदिरा जवळ आलो. मंदिरा समोर दीपमाळ, वीरगळ व इतर अवशेष पाहिले. येथे निरवला एक जात्याचे अवशेष झाडी मध्ये पडलेले दिसले. मग मी ते झाडीतून बाहेर काढले व समोर असलेल्या अवशेषा सोबत ठेवले. गारजाई देवी मंदिर दरवाजाचा डाव्या बाजूला एक शिलालेख पाहिला.
मंदिरा मध्ये प्रसन्न अशी गारजाई देवीची मूर्ती व इतर मूर्ती व अवशेष पाहिले. थोडे पुढे चालून आल्या नंतर उजव्या बाजूला महादरवाजा ठेऊन आम्ही डाव्या बाजूला मार खिंडीत आलो. तेथे नैसर्गिक दगडा वरती दगड रचलेला आहे व हि जागा फोटो साठी प्रसिद्ध आहे तेथे आलो. तेथून घनगडाचा दक्षिण दिशेला थोडासा वळसा व अवघड वाट पार करून गुहे मध्ये आलो. हि गुहा पहारा ठेवण्या साठी बनवलेली असावी असे जाणवले.
 |
| गारजाई देवीची मूर्ती - घनगड |
 |
| गारजाई मंदिरा समोरील दीपमाळ व अवशेष - घनगड |
 |
| गारजाई मंदिरा येथील शिलालेख - घनगड |
 |
| गारजाई मंदिरा समोरील अवशेष - घनगड |
 |
| घनगडावरील गुहा |
गुहा पाहून माघारी आलो व महादरवाजा मधून गडावरती प्रवेश केला. प्रवेशा समोर कातळामध्ये बनवलेल्या दोन गुहा पाहिल्या. प्रवेशव्दारातून आत आल्यावर उजव्या बाजूला एक प्रचंड मोठा खडक वरच्या कातळातून निसटून खाली आला आहे. हा दगड कातळाला रेलून उभा राहील्यामुळे येथे नैसर्गिक कमान तयार झालेली आहे हि देखील घनगडावर फोटो घेण्यासाठीचे प्रसिद्ध ठिकाण. या कमानीतून पुढे आल्या वरती वरच्या बाजूला कातळात कोरलेली छोटी गुहा आहे त्या मध्ये देवीची मूर्ती ठेवलेली आहे. तेथून पुढे देखील एक पाण्याचे टाके, पूर्वी तेथे जाण्यासाठी तार लावलेली होती ती आता तुटून पडल्याने वाट जोखमीची झाली होती तेथून माघारी आलो.
 |
| घनगडाचे प्रवेशद्वार - घनगड |
 |
| प्रवेशद्वारा समोरील गुहा - घनगड |
 |
| वरचा कातळातून निसटून आलेला खडक - घनगड |
 |
| गुहा व देवीची मूर्ती - घनगड |
प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला पूर्वी पायऱ्या होत्या. येथे आता लोखंडी शिडी बसवलेली आहे
त्या शिडीचा आधारे आम्ही वरती चढून आलो. शिडीच्या शेवटच्या पायरी समोर कातळात कोरलेल टाक आहे. तेथून थोडे पुढे कातळातील पायऱ्या चडून आलो व तेथील दोन खांब टाकि व जोड टाक्या पाहिल्या. तेथे समोर ०२ गुहा पहायला मिळाल्या, येथून समोरील भागावर नजर ठेवण्यासाठी बनवण्यात आल्या असाव्या. पुढे थोडी अवघड वाट चढून समोर असलेल्या दरवाजा मधून बाल्ले किल्यावरती आलो. या दरवाजाचा डाव्या बाजूला खाली पायऱ्या उतरून खोदीव पाण्याचे टाके (भुयारी टाके) आहे ते पाहिले.
 |
| बाल्लेकिल्ल्या वरती जाण्यासाठी बसवलेली लोखंडी शिडी - घनगड |
 |
| पाण्याचे टाके - घनगड |
 |
| खांब टाके - घनगड |
 |
| पहारे काऱ्यांची गुहा - घनगड |
 |
| खोदीव पाण्याचे टाके (भुयारी टाके) - घनगड |
बाल्ले किल्याचा प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला असलेला दोन मजली मोठा बुरुज सौचकुप पाहून सर्वोच्च माथ्या वरती आलो. तेथे आता ध्वजस्तंभ उभारलेला आहे
. तसेच तेथील सदर, वास्तूंचे अवशेष, पाण्याचे टाके व कोठार पाहिले. गडमाथ्यावरून दिसणारे किल्ले तैलबैला, सरसगड, सुधागड पाहिला
. निरवने लगोलग प्रति प्रश्न केला मला कधी सुधागड दाखवणार. या आधी ०३ वर्षा पूर्वी तैलबैला वरून देखील त्याने हाच प्रश्न विचारला होता. तेथे आमची भेट झाली "महेश धिंडाले" यांच्याशी ज्यांचा "पायवाटा" या नावाने youtube
चॅनेल आहे. त्यांनी प्रथम निरवकडे पाहत हा किती वर्षाचा आहे व गड स्वतः पूर्ण चढून आला का असा प्रश्न केला, आम्ही त्यांना हो व हा त्याचा ५० वा किल्ला आहे असे सांगताच निरवची लहानशी मुलाखत घेतली व सर्वांनी कौतुक केले. तेथून माघारी फिरून खाली आलो व शिडीचा वरती असलेल्या टाक्यातील पाणी भरून घेतले आणि गड उतार झालो. पुढे भांबर्डे जवळ असलेल्या हॉटेल घनगड पायथा येथे जेवण केले 
व तैलबैला पहायला निघालो.
 |
| दोन माजली असलेला घनगडावरील मोठा बुरुज - घनगड |
 |
| धवजस्तंभ - घनगड |
 |
| घनगडावरून मागे दिसत असलेला तैलबैला - घनगड |
 |
| पाण्याचे टाके - घनगड |
 |
| कोठार - घनगड |
 |
| बुरुज - घनगड |
तैलबैला 
तैलबैला दुरून पाहिला कि फक्त ०२ उंच भिंती दिसतात. त्या दोन भिंतीचा मधील खिंडी पर्यंत सहज जाता येते. तेथे गावकऱ्यांनी मंदिर बांधलेले आहे. तैलबैला आठवला कि निरवला तेथील हे मंदिर मागील वेळी आम्ही पूर्ण स्वच्छ केले होते ते आठवते. या तैलबैलाच्या दोन्ही भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे तंत्र पूर्णपणे अवगत असणे आणि गिर्यारोहणाचे सामान असणे अत्यावशक आहे. आम्ही त्या मंदिरा जवळ आलो. तेथे असलेल्या गुहा व मंदिराचा समोर असलेली पाण्याची टाकी पाहून मंदिर मध्ये आलो. मंदिरा मध्ये एक पाण्याचे टाके. गडावरील टाक्यातील थंड व स्वछ पाणी हे आम्हाला अमृता समान ते घेतले. तेथून माघारी फिरलो व तैलबैला चा येथून दिसणारा सूर्यास्त पाहून गड उतार झालो. पुढे गाडी काढली व लोणावळचा दिशेने निघालो व धावत पळत ट्रेन पकडली आणि रात्री ०९:०० वाजता पुण्याला येऊन पोहचलो. असा हा निरवचा उच्छाहातील ५० व्या गडदुर्गांची भटकंती पूर्ण झाली व बोनस मध्ये तैलबैला त्याने दुसऱ्यांदा पूर्ण केला.
 |
| तैलबैला |
 |
| पाण्याचे टाके - तैलबैला |
 |
| मंदिर व पाण्याचे टाके - तैलबैला |
सोबती: अजित गवेकर, शुभम ओऊळकर, विष्णू नेरुरकर आणि निरव राजगोळकर .
©सुशील राजगोळकर