हम्पी हे एक भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे. हम्पीचे अवशेष हे युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे. खूप इमारती व मंदिरांचे अवशेष १४ किलोमीटरचा परिघा मध्ये पसरलेले आहेत. या मध्ये महान हिंदू साम्राज्यातील "किल्ले, बाजारपेठ, नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा" समावेश आहे. यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान असे केले आहे. खूप दिवसापासून हम्पी फिरायची ईच्छा होती. पण एक दोन दिवसात धावत पळत जाण्या सारखे नाही म्हणून टाळत आलो. ऑफिस मधून १५ दिवस हिवाळी सुट्टी मिळाली होती. पण नियोजन काही न्हवते. १४ जानेवारी २०२४ ला महाराष्ट्र मधील सर्वात ऊंच धोडप किल्लाचा ट्रेक करून आलो. आता पुढे ८ दिवस काय करायचे असा प्रश्न होता. मग निश्चय केला या वेळी आपण हम्पी फिरायला जायचे, मुलाची शाळा चालू असल्याने एकटाच (#Solo) जायचे ठरवले.
मित्राकडून थोडी व काही google वरून माहिती जमा केली व बुधवार १७ जानेवारी २०२४ ला रात्री ०१:०० वाजता पुणे रेल्वे स्टेशन वरून रेल्वे पकडली व निघालो हम्पीला, रेल्वे मधून दिसणारा सूर्योदय, मोर, शेती, धरण पाहत ट्रेन मध्येच जेवण केले व दुपारी ०१:०० वाजता "होस्पेटला" येऊन पोहचलो. रेल्वे स्टेशन वरती मुंबई वरून आलेले ०३ नवीन मित्र भेटले त्यांचा सोबत होस्पेट ते हम्पी असा रिक्षा मधून प्रवास सुरू केला व हम्पीचा बाजार / बस स्टॉप जवळ येऊन थांबला तेथे डोळ्या समोर विरुपाक्ष मंदिर दिसले. रिक्षावाल्या काकांना आम्ही प्रत्येकी ६०/- रुपये भाडे दिले. व मंदिराचा बाजूला असलेल्या लहान हम्पी गावामध्ये खोली/हॉटेल शोधले. पुढील दोन दिवसासाठी "Venue होम स्टे" यांच्याकडे मी खोली घेतली (Kumari +919483935624) खोलीचे
०२ दिवसाचे ११००/- रुपये भाडे दिले व फ्रेश होऊन लहान बॅग मध्ये कॅमेरा व पाणी घेऊन पहिल्या दिवसाचा संध्याकाळचा फेरफटक्याला सुरवात केली.
"विरुपाक्ष मंदिर"
खोली पासून अगदी जवळ असलेल्या विरुपाक्ष मंदिरा पासून मी हम्पी येथील प्रेक्षणीय स्थळे पाहायला सुरवात केली. या मंदिराला असलेले भारदस्त मनोरा (गोपुर/प्रवेशद्वार) व त्यावरील नक्षीकाम नजरेस भावले. मंदिरामध्ये प्रवेश करतांना गोपुरामध्ये उजव्या बाजूला कोरलेल्या अंजनेय / हनुमानाला नमस्कार करून मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिर मध्ये प्रवेश करताच डाव्या बाजूला असलेल्या लक्ष्मी हत्ती पाहिला. मंदिर समोर लहान घूमटी मध्ये ०३ नंदी एकत्र असलेले पाहिले. समोर सभा मंडपाचे खांब व त्यावरील नक्षी काम पाहण्या सारखे आहे या प्रकारचे नक्षीकाम हम्पी मध्ये सर्वत्र पाहायला मिळाले. रंगमंडपाचा छताला केलेली पेंटिंग ही सर्वात उल्लेखनीय अवशेषांपैकी एक आहे. या मंदिरामध्ये इतर लहान खूप मंदिरे, देवतांचा मुर्त्या आहेत. पुढे मुख्य गर्भगृहामध्ये स्वयंभू असलेल्या शिवलिंगाचे (विरुपाक्ष) दर्शन घेतले व गाभाराचा मागे आलो. तेथे काही पायऱ्या चालून वरती आल्या नंतर उजव्या हाताला एक लहान छिद्रांमधून येणाऱ्या प्रकाशमुळे तेथील भिंती वरती मुख्य गोपुराचे उलटे प्रतिबिंब दिसते हे एक या मंदिरामध्ये त्याकाळी बनवलेला वैज्ञानिक दृष्टिकोन वाटला. विरुपाक्ष मंदिराचा उत्तर दरवाजामधून बाहेर आलो दरवाजाचा इथे एक शिलालेख कोरलेला पाहायला मिळाला. तेथे आणखीन काही लहान मंदिरे व त्या समोरील मोठा पाण्याचा "मनमथा टॅंक(तलाव/पुष्कर्णी)" येथे आलो हा मनमथा टॅंक पुष्कर्णी सारखा बांधून घेतलेला पाहायला मिळाला. तसेच या टॅंक चा एका बाजूला खूप सारे नागशिल्प कोरलेले दगड एकत्र ठेवलेले पाहिले. टॅंक समोर हनुमान व शिवलिंग एकत्र असलेले एक लहान मंदिर पाहिले. तसेच टॅंकचा उत्तर दिशेला (नदीकडील बाजूला) एका मंदिरा मध्ये ४-५ फूट ऊंच दगडावरती सातफनी नागशिल्प कोरलेले पाहायला मिळाले. तेथून माघारी विरुपाक्ष मंदिराचा समोर आलो व तेथून मंदिराचा बाजूला असलेल्या हेमकूटा टेकडी व हेमकूटा मंदिर समूह पाहायला आलो.
|
"विरुपाक्ष मंदिर" |
|
"विरुपाक्ष मंदिर" |
|
"विरुपाक्ष मंदिर" |
|
"मनमथा टॅंक(तलाव/पुष्कर्णी)" |
"हेमकूटा टेकडी व हेमकूटा मंदिर समूह"
विरुपाक्ष मंदिर जवळून थोडे वरती उत्तर दिशेचा प्रवेश द्वारामधून हेमकूटा टेकडी वरती प्रवेश केला. हि टेकडी पूर्ण पणे दगडाची दिसून आली पण त्या दगडावरती खूपसारी लहान मोठी कित्येक मंदिरे व मंडप बांधलेले पाहायला मिळाले. या टेकडीला पूर्व व उत्तर दिशेला असे दोन प्रवेशद्वार आहेत. तसेच पूर्ण टेकडी स्वरक्षित भिंतीने बांधून घेतलेली पाहिली. टेकडी वरती एक "गायत्री पीटा मंदिर" व एका लहान मंदिर मध्ये मोठी "अंजनेयाची (हनुमान) मूर्ती" पाहायला मिळाली. पुढे दिसत असलेला दुमजली मंडप पाहून पूर्व दिशेचा प्रवेश द्वारातून बाहेर थोडे खालील दिशेला असलेला सासिवे काळू गणेश पाहिला.
|
"हेमकूटा टेकडी व हेमकूटा मंदिर समूह" |
|
"हेमकूटा टेकडी व हेमकूटा मंदिर समूह" |
|
"हेमकूटा टेकडी व हेमकूटा मंदिर समूह" |
|
"हेमकूटा टेकडी व हेमकूटा मंदिर समूह" |
|
"हेमकूटा टेकडी व हेमकूटा मंदिर समूह" |
"सासिवे काळू गणेश"
हे मंदिर/स्मारक खुले मैदान असलेल्या स्तंभांचा मंडपाची रचना असलेले आहे. या मंडपामध्ये अखंड दगडातील गणेशाचे मोठे शिल्प आहे. मागील बाजूने हि मूर्ती पाहिल्यास, गणेश त्याची आई पार्वतीचा मांडीवरती विराजमान दिसतो. होस्पेट वरून हम्पीला येतांना सर्वात आधी दिसणारे हे स्मारक आहे. हे स्मारक पाहून मी परत हेमकूटा टेकडी वरती आलो व तेथून दिसणारा सुंदर "सूर्यास्त" पाहून पहिल्या दिवसाचा फेरफटका संपवला व खोली वरती आलो. थोडे आवरून हॉटेल गणेश रूप टॉप येथे आलो. तासभर हम्पी चे पुस्तक वाचन केले व दुसऱ्या दिवसाचे नियोजन आखले व जेवण करून खोली वरती येऊन झोपी गेलो.
|
"सासिवे काळू गणेश" |
|
"सासिवे काळू गणेश" |
दिवस दुसरा गुरुवार १८ जानेवारी २०२४
"मातंग पर्वत"
सकाळी ०५:०० वाजता उठून सूर्योदय पाहण्यासाठी चालत मातंग पर्वत / टेकडी चा दिशेने निघालो, अंधारामध्ये वाटेवरती असलेला नंदी लागला पण मी तेथून पुढे google मॅपचा साहाय्याने वाट शोधत व मोबाईल विजेरीचा प्रकाशामध्ये काहीशी अवघड पायऱ्यांची वाट पार करून पर्वता वरती येऊन पोहचलो. टेकडी वरती असलेल्या मंदिरा मध्ये "वीरभद्रचे" दर्शन घेऊन सूर्योदयाची वाट पाहू लागलो. काही वेळात सूर्योदय झाला तेथून दिसणारा हम्पीचा पूर्ण परिसर पाहिला व पर्वता वरून पायथ्याला दिसणारे भव्य अच्युतराया मंदिर खुणावू लागले. पर्वत उतरतांना वेगवेगळ्या पक्षांचे आवाज ऐकत व काही पक्षांचे फोटो मिळाले ते घेत अच्युतराया मंदिरामध्ये आलो.
|
"मातंग पर्वत" |
"अच्युतराया मंदिर"मातंग पर्वताचा वाटेवरती असलेल्या मंदिराचा पश्चिम दिशेला असलेल्या गोपुरातून (प्रवेशद्वार) मंदिरामध्ये प्रवेश केला. हे मंदिर उत्तर मुखी आहे. मंदिराला दोन संरक्षक भिंती आहेत. मंदिराचा प्रवेशद्वारला उत्तर दिशेला दोन्ह गोपुर आहेत, गोपूराचा वरील भाग जरी कोसळला असला तरी त्या सकाळचा कोवळ्या उन्हामध्ये गोपुर एकदम लखलखीत दिसत होते. मंदिराचा भव्यते मध्ये भर घालते ते या मंदिराचा खांबावरील नक्षीकाम. मंदिराचा समोर एक लहान ०३ बाजूने बंद असलेली घुमटी पाहायला मिळाली. मंदिराचा एका बाजूला सभामंडप आहे तेथील खांब देखील नक्षीकामाने भरीव आहेत. मंदिरा समोर तितकीच मोठी "अच्युतराया बाजारपेठ" व "अच्युतराया पुष्करणी/कुंड" आहे. तेथून मी माघारी नंदीचा दिशेने आलो वाटेवरती एक लहान मारुती मंदिर लागले तेथून नंदीचा मंडप मध्ये आलो. |
"अच्युतराया मंदिर" |
|
"अच्युतराया मंदिर" |
"नंदी (आखंड नंदी/ येदुरू बसवण्णा)"
हा नंदी आखंड एका दगडामध्ये बनवलेला आहे. विरुपाक्ष मंदिराकडे मुख असलेला या नंदी दुमजली मंडपा मध्ये आहे. विरुपाक्ष मंदिरा पासून ते या नंदी पर्यंत पर्यंत रस्त्याचा दुतर्फा बाजारपेठ आहे. तर नंदीचा एका बाजूला दुमजली मंडप आहे.
|
"नंदी (आखंड नंदी/ येदुरू बसवण्णा)" |
नंदी पाहून झाल्या नंतर खोली वरती आलो व फ्रेश होऊन खोलीचा बाजूलाच असलेल्या अर्चना रिव्हरव्हिव येथे नाष्टा केला. व परत चालत दुसऱ्या दिवसाचा भटकंतीला सुरवात केली. आखंड नंदीचा थोडे अलीकडे डाव्या बाजूला एक प्राचीन मार्ग जातो "कम्पा भूपा पाथ" तेथून चालत निघालो. चालताना डाव्या बाजूला तुंगभद्रा नदी व उजव्या बाजूला असलेले मंडप व प्राचीन अवशेष पाहत कोदंड राम मंदिरा जवळ पोहचलो.
"कोदंड राम मंदिर"
कोदंड राम मंदिर हे तुंगभद्रा नदीचा काठी "चक्रतीर्थ"
जवळ आहे. या मंदिराचा गाभाऱ्यामध्ये काळ्या पाषाणामध्ये कोरलेले कोदंड राम, लक्ष्मण, सीता आणि सुग्रीव यांची शिल्पे आहेत. गर्भगृहा समोर मंडप आहे. या मंदिर मध्ये आता देखील पूजा केली जाते, जे इतर हम्पी मधील मंदिरा मध्ये मूर्ती नसल्याने / खंडित असल्याने पूजा केल्या जात नाहीत.
|
"कोदंड राम मंदिर" |
"यंत्रोद्वारक अंजनेय मंदिर"
कोदंड राम मंदिरचा मागिल टेकडी वरती हे यंत्रोद्वारक अंजनेय मंदिर आहे. मंदिराचा गर्भगृहा मध्ये एक काळ्या पाषाणवर ताऱ्यांचा आकारामध्ये बंदिस्त पद्मासनामध्ये बसलेले अंजनेय आहेत. कोदंड राम मंदिरचा मागे व यंत्रोद्वारक अंजनेय मंदिरा बाजूला असलेलले "श्री हस्तगिरी रंगनाथ मंदिर" व "श्री विष्णू मंदिर १" पाहिले. तेथून उजव्या हाताला अच्युतराया पुष्करणी, बाजार व मंदिर होते पण मी हे पहाटे पाहिल्यामुळे डाव्या बाजूला पुढे दिसत असलेल्या वराह (शैव) मंदिरा मध्ये आलो.
|
"यंत्रोद्वारक अंजनेय मंदिर" |
"वराह (शैव) मंदिर"
हे वराह मंदिर संरक्षक भिंतीचा मध्ये बांधलेले आहे. मंदिराचा समोर त्याकाळी भव्य गोपुर असावा आता फक्त तेथे गोपुराचे खालील दगडी बांधकाम (प्रवेशद्वार) अस्तित्वात आहे मंदिराचा गर्भगृहा मध्ये शिवलिंग व बाहेर नंदी आहे. वराह मंदिरा समोरील पुढे विष्णू मंदिर २ येथे आलो.
|
"वराह (शैव) मंदिर" |
"विष्णू मंदिर २"
हे विष्णू मंदिर अगदी वराह मंदिरचा समोर आहे या विष्णू मंदिराचा गर्भगृहाचा भिंती वरती सातफनी सापावरती विष्णूंची अनंतासनातील मूर्ती आहे त्या मूर्तीला चार भुजा आहेत, पायाकडे दोन देवी आहेत, बेंबीतून ब्रम्हकमळ आले आहे व त्या ब्रम्हकमळामध्ये तीनमुखी देव आहे. या मंदिरामध्ये पूजा होता नाही. अशा अनंतासनातील विष्णू अवतारातील शिल्प / मूर्ती हम्पी मध्ये देखील खूप प्रमाणामध्ये पाहायला मिळाल्या.
|
"विष्णू मंदिर २" |
"नरसिंह मंदिर"
विष्णू मंदिरा पुढे आणखीन दोन मंदिरे पाहून उजव्या बाजूला टेकडी वरती असलेल्या "नरसिंह मंदिरा" मध्ये आलो या मंदिराला संरक्षण भिंत असून आपण ज्या बाजूने पायऱ्या चढून प्रवेश करतो त्याचा विरुद्ध दिशेला मुख्य गर्भगृहामध्ये जाण्यासाठी दरवाजा आहे. मंदिराचा टेकडी वरील दिशेला "दुमजली मंडप" आहे. मंदिराचा कळस दगडांचा पायऱ्या प्रमाणे रचलेला पाहायला मिळाला. मंदिराचा बाजूला दीप लावायचा स्तंभ आहे.
|
"नरसिंह मंदिर" |
नरसिंह मंदिराचा विरुद्ध दिशेला
सुग्रीव गुहा
दिसत होते पण मी परत येतांना पाहायचा ठरवले व विठ्ठल मंदिराचा दिशेने / उजव्या बाजूने झाडा झुडपांचा वाटेने चालत आलो वाटेमध्ये एक मंडप होता त्यामध्ये हनुमानाचे शिल्प आहे तेथून पुढे काही अवशेष व डाव्या बाजूला किल्ला सारखी तटबंदी पाहिली व समोर असलेल्या "दुमजली मंडप" पाशी आलो या मंडपाचा दोन्ही बाजूला लहान खोल्या आहेत कदाचीत हा दुमजली मंडप या भागातील एक प्रवेशद्वार असावा. मंडपामधून पुढे डाव्या बाजूला "विष्णूचे मंदिर" व उजव्या बाजूला एक लहान बांधीव विहीर आहे तर अगदी समोर "राजाचा तराजू" स्तंभ आहे. हा तराजू त्याकाळी महत्वाचा प्रसंगी राजाची तुळा करण्यासाठी वापरत असावेत. तसेच या ठिकाणी मंदिराकडे व राजाची तुला स्तंभा कडे मुख करून साष्टांग नमस्कार करणारे लोक जमनीवरती / दगडामध्ये कोरलेले पाहायला मिळाले. या राजाचा तुळा स्तंभाचा मागे पूर्ण पडझड झालेले मंदिर आहे तेथून पुढे विठ्ठल मंदिराचा बाजूला असलेले "नम्माळवार मंदिर" पाशी आलो मंदिरा मध्ये प्रवेश बंद होता, पण या मंदिरा वरती चोहो बाजूने एक सारखे सुंदर नक्षी काम केलेले पाहिले. त्यानंर मी हम्पी मधील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या श्री विजया विठ्ठला मंदिरा पाशी आलो.
|
"दुमजली मंडप" |
|
"राजाचा तराजू" |
|
"नम्माळवार मंदिर" |
"श्री विजया विठ्ठला मंदिर"
हम्पी मधील सर्वात महत्वाचा मंदिरापैकी हे एक. या मंदिरामध्ये मुख्य पूर्व दिशेचा भव्य गोपुरातून प्रवेश केला. समोरच आपल्या भारतीय चलनातील ५०/- रुपयाचा नोटेवरील "दगडाचा रथ" पाहायला मिळाला. डाव्या बाजूला असलेला कल्याण मंडप हा खूपच सुशोभित नक्षीकाम केलेला खुला मंडप पाहिला. दगडी रथाचा अगदी समोर ५६ संगीत स्तंभांचा मंडप आहे आता या मंडपा मध्ये जाण्यास बंदी होती, या प्रत्येक ५६ स्तंभामधून वेगवेगळा आवाज येतो. मंडपाचा पायऱ्यांना हत्तीचा शिल्पाचे कठडे आहेत. तेथून मी मुख्य विठ्ठल मंदिरामध्ये आलो या मंदिरामधील प्रत्येक स्तंभा वरील नक्षीकाम एक गोष्ट / कथा सांगते इतके सुंदर नक्षीकाम केलेले पाहिले. विठ्ठल मंदिर स्वरक्षक भिंतींनी बांधून घेतले आहे व एकूण पूर्व, दक्षिण व ऊत्तर आशा ०३ दिशेला ०३ गोपुर / प्रवेशद्वार आहेत. मी विठ्ठल मंदिराचा दक्षिण प्रवेशद्वारातून बाहेर आलो व मुख्य पूर्व प्रवेशद्वारा जवळ आलो तेथून दक्षिणेकडे तोंड करून असलेले जुने शिव मंदिर पाहायला आलो.
|
"श्री विजया विठ्ठला मंदिर" |
|
"श्री विजया विठ्ठला मंदिर" |
|
"श्री विजया विठ्ठला मंदिर" |
|
"श्री विजया विठ्ठला मंदिर" |
|
"दगडाचा रथ" - "श्री विजया विठ्ठला मंदिर" |
|
"दगडाचा रथ" - "श्री विजया विठ्ठला मंदिर" |
"जुने शिव मंदिर"
विठ्ठल मंदिर लोकांनी गजबजलेले होते पण त्याचा विरुद्ध या मंदिर मध्ये फक्त मी एकटा व तेथील भीतीदायक शांतता. या मंदिरा मध्ये रामायण मधील काही द्रुषे कोरलेली आहेत. तर मंदिरा मधील स्तंभावरती भारदस्त नक्षीकाम पाहायला मिळाले. मंदिरामध्ये मुख्य मंडपाचा बाजूने फेरा मारला व बाहेर आलो. या मंदिरा पासून विठ्ठल मंदिरा पर्यंत या मंदिराची बाजारपेठ जोडलेली आहे.
|
"जुने शिव मंदिर" |
पुढे विठ्ठल मंदिराचा मागून ज्या मार्गी आलो त्या मार्गी माघारी निघालो. राजाची तुळा स्तंभा पाशी आलो व येतांना जा वाटे आलो तेथून न जाता उजव्या हाताला पुढे आलो. तेथे असलेले नदी पात्रामध्ये साध्या स्तंभाचा (नक्षीकाम नसलेले स्तंभ) "पुरंदरदास मंडप" आहे तो पाहिला व तेथे नदी पात्रामध्ये निरनिराळ्या रंगांचे थोडे लहान दगड जमा केले. तेथून त्या काळातील तुंगभद्रा नदी पार करण्यासाठी बनवलेला "पुरातन पुलाचे अवशेष" / दगडांचे स्तंभ दिसत होते. पुरंदरदास मंडप पाहून पुढे आलो तेथून एक वाट उजव्या बाजूला नदी पात्राकडे जात होती तिकडे काय आहे पाहण्यासाठी आलो तेथे सुंदर शांत "श्री रंगुनंदना तीर्थ" आश्रम/मठ होता तो पाहून माघारी आलो व "सुग्रीव गुहा" पाहिल्या थोडे पुढे ऊजव्या हाताला एक फलक होता कोटिलिंग" व "विष्णू दशावतार शिल्पे मी ते पाहायला नदी पात्रामध्ये शिरलो.
|
"पुरंदरदास मंडप" |
"कोटिलिंग" व "विष्णू दशावतार शिल्पे"
नदी पत्रामध्ये पाणी न्हवते पण दगडांवरून सावकाश चालत आत मध्ये बरेच अंतर पुढे आलो. ऊजव्या बाजूला दगडांवरती विष्णू दशावतार शिल्पे कोरलेली दिसू लागली, ती शिल्पे जवळ जाऊन पाहिली व तेथून पुढे दोन मंदिरे दिसत होती पण वाट अवघड असल्याने मी माघारी फिरलो. त्या नंतर मी "कोटिलिंग"
शोधू लागलो पण मला अर्ध्या तासाहून जास्त वेळ एकटाच शोधूत होतो, विचारायला आजू बाजूला कोणीच न्हवते. दुपारचे ०१:०० वाजून गेले होते रखरखते ऊन लागत होते. तितक्यात दगडांचा पलीकडे लपलेला एक आडवा स्तंभ दिसला मी तेथे जाऊन पाहिले तर ते एक सुंदर मंदिर होते. तेथून नदीपलीकडे असलेले मंदिर त्याला असलेल्या पायऱ्या व नंदी पाहिला व बाहेर आलो. नदी पात्रातील तेथील दगडांची रचना पाहून असे वाटले कि तेथे पूर्वी खूप मोठे मंदिर असावे. तेथून मी माघारी येत होतो तितक्यात मित्राची आठवण झाली व मी तेथून माझा मित्राला (आनंद बिराजदार) विडिओ फोन केला त्या प्रमाणे कोटिलिंग पाशी जाऊन पोहचलो. पाहतो तर काय एक वेगळ्या प्रकारचे एकाच ठिकाणी शिवलिंगाचा आकारामध्ये लहान लहान शिवलिंग कोरलेले आहेत, व शिवलिंगा समोर नंदी देखील कोरलेले पाहिले, तेथेच "विष्णूची अनंतासना" मधील एक मोठी मूर्ती पाहायला मिळाली व तेथे इतर देवतांचा मूर्तीचे अवशेष देखील पाहायला मिळाले. हे हम्पी मधील एक आडवाटेवरील प्रसिद्ध कोटिलिंग पाहून माझे मन प्रसन्न झाले. तितक्यात तिकडून आणखीन दोघे जण येत होते त्यांनी मला हाक दिली, मी त्यांना मार्ग सांगितला. तेथून पुढे मी कोदंडरराम मंदिर जवळ आलो व एक तासभर विश्रांती घेतली.
|
"अनंतासना मधील विष्णू - कोटिलिंग" |
|
"कोटिलिंग" |
|
"कोटिलिंग" |
|
"कोटिलिंग" |
|
"विष्णू दशावतार शिल्पे" |
विश्रांती नंतर मी कम्पा भूपा रोड वरून विरुपाक्ष मंदिराचा दिशेने चालत आलो. व मुख्य बाजारचा रस्त्या वरून हेमकूट टेकडी जवळील "कडले काळू गणेश" येथे आलो. या मंदिराचा मुख गाभाऱ्यामध्ये भला मोठा अखंड दगडा मधील गणेशाची मूर्ती पाहिली, मंदिरा समोरील मंडपाचा उंच स्तंभा वरती हिंदू देवीदेवतांचे शिल्पे कोरलेली आहेत, ते पाहून मी "कृष्ण मंदिर" मध्ये आलो. हे मंदिर हम्पी मधील भव्य मंदिरा पैकी एक असावे या मंदिराचा गोपुरावरील व मंडपाचा स्तंभा वरील नक्षीकाम खूपच सुंदर आहे, मंदिरामध्ये इतर बरीच लहान मंदिरे आहेत ते पाहून मी मंदिर समोरील "कृष्ण बाजार" व तेथील "पुष्कर्णी" पाहिली.
|
"कडले काळू गणेश" |
|
"कडले काळू गणेश" |
|
"कृष्ण मंदिर" |
|
"कृष्ण मंदिर" |
|
"कृष्ण बाजार" व "पुष्कर्णी" |
पुढे कृष्ण मंदिराचा बाजूलाच असलेले "लक्ष्मी नरसिम्हा मंदिर" (लक्ष्मीनरसिंह मूर्ती) येथे आलो. लक्ष्मीनरसिंहाचि मूर्ती अखंड दगडामध्ये बनवलेली आहे. हि मूर्ती सापाच्या वेटोळ्यावरती बसवलेली आहे व डोक्या वरती सातफनी दिसतात. लक्ष्मीनरसिंह मंदिराचा बाजूलाच "बडव लिंग (मोठे शिवलिंग)" आहे. हे एक ०३ मीटर उंच असे विशाल अखंड शिवलिंग आहे. बडव शिवलिंग मंदिराचा मागे तुंगभद्रा नदी मधून त्याकाळी एक लहान कालवा आणलेला आहे तो अजून चालू आहे त्यामुळे शिवलिंगाचा खालील भाग कायम पाण्यामध्ये असतो. लक्ष्मीनरसिंह व बडव लिंग हे हम्पी मधील आकर्षण पैकी एक आहे. पुढे मी तेथून सासिवे काळू गणेश येथून हेमकूटा टेकडी वरती आलो तेथून विरुपाक्ष मंदिराचा मागे असलेली "लोकपवणी पुष्कर्णी" व तेथील काही अवशेष पाहून मी दुसऱ्या दिवसाची भ्रमंती संपवली व विरुपाक्ष मंदीर मागून खोली वरती आलो व फ्रेश होऊन तिसऱ्या दिवसासाठी खोली शोधून ठेवली. (गणेश होम स्टे शशिधर +919449981037).
|
"लक्ष्मी नरसिम्हा मंदिर" |
|
"बडव लिंग (मोठे शिवलिंग)" |
दिवस तिसरा शुक्रवार १९ जानेवारी २०२४
सकाळी लवकर उठून आवरले व बॅग आवरून खोली मालकांचा घरी ठेवली, कारण संध्याकाळी आल्यानंतर गणेश होम स्टे वरती रहायला जायचे होते. नाश्ता करून निघायचे म्हणून ०६:३० वाजता खोली बाहेर पडलो, पण इतक्या सकाळी नाश्ता मिळाला नाही. मग मी माझा नियोजना प्रमाणे "सायकल" भाड्याने घेतली व "शाही केंद्र (Royal
Center)" विभागाचा भटकंती साठी निघालो. कृष्णा मंदिरचा काही अंतर पुढे जाता "श्री चंडिकेश्वर मंदिर" आहे तेथे येऊन सायकल थांबवली. श्री चंडिकेश्वर मंदिराचा बाहेर नक्षीकाम केलेला मंडप आहे, मंदिराचा मुख्य गाभारा बंद होतो. त्या मंदिरा शेजारीच "श्री उड्डाना वीरभद्र मंदिर" आहे त्या मंदिराचा प्रवेशद्वार मधून आत आलो समोर काही वीरगळी सारखे अवशेष, हनुमानाचे शिल्प, दीप स्तंभ, व इतर अवशेष पाहिले त्या समोर लहान घुमटी मध्ये तीन नंदी आहेत तेथे नमस्कार करून गाभाराकडे आलो समोर नंदी व मुख्य गर्भगृहामध्ये उड्डाना वीरभद्राची जवळपास १० ते ११ फूट ऊंच सुंदर अशी मूर्ती पाहिली पण मंदिराला आता कलर केलेला आहे व काही भाग नव्याने जीर्णोद्धार केलेला पाहिला. मंदिरामधजून बाहेर आलो व जवळच असलेले अगदी लहान "अंजेनेय",
"गणेश मंदिर" व त्या मागे असलेले "हिरे छत्र" पाहायला आलो ते अगदी इतर बाजार पेठा सारखेच पण थोडे वेगळे आहे.
|
"श्री चंडिकेश्वर मंदिर" |
|
"श्री उड्डाना वीरभद्र मंदिर" |
|
"हिरे छत्र" |
"भूमिगत शिव मंदिर (प्रस्सन विरुपाक्ष)"
श्री उड्डाना वीरभद्र मंदिर पासून पुढे मी सकाळचा सूर्योदय व केळीचे शेती पाहत शाही केंद्राचा मार्गावरील "भूमिगत शिव मंदिर (प्रस्सन विरुपाक्ष)" येथे आलो. या मंदिराला जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून प्रवेशद्वार आहे तेथून आत मध्ये आलो, मंदिर पूर्वमुखी आहे. मंदिराचा काही भाग व नंदी पाण्यामध्ये होता तर गर्भगृहा मध्ये पूर्णपणे अंधार, पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मारली व मंदिराचा आजू बाजूने पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी लहान दगडी पाट बनवलेले आहेत. हे पूर्ण मंदिर जमीन सपाटीचा वरती नाही त्यामुळे या मंदिराचे नाव भूमिगत शिव मंदिर असे असावे. तेथून बाहेर आलो व उजव्या हाताला किल्ल्या सारख्या बंद्धीस्त भिंतीचा येथून आत मध्ये आलो व "पहारेकरीचा सुशोभित मनोरा" व "कृष्णदेवराय यांचा महाल" पाहिला व तेथून बाहेर आलो. तेथे त्याचा विरुद्ध दिशेला असलेल्या एका मोठा दगडांचा आधाराने आता एक लहान मनोरा बांधला आहे, तेथून खूप दूरवर मोठा प्रमाणात असलेले "सरदारांचा घरांचे अवशेष" पाहायला मिळाले तेथून थोडे पुढे डाव्या बाजूला मला पुरातत्व ख्यात्यामार्फत उत्खनन चालू असलेलले काम पाहायला मिळाले. तेथील काम व परिसर पाहता भविष्यात आणखीन खूप मोठे अवशेष पाहायला मिळतील असे वाटले.
|
"भूमिगत शिव मंदिर (प्रस्सन विरुपाक्ष)" |
|
"पहारेकरीचा सुशोभित मनोरा" |
|
"सरदारांचा घरांचे अवशेष" |
"जनांन कुंपण"
पुढे डाव्या बाजूला जनांन कुंपण व उजव्या बाजूला हजार रामचंद्र मंदिर आहे मी डाव्या बाजूला असलेले "जनांन कुंपण" येथे आलो याचा आत मध्ये "पहारा देण्याचे तीन मिनार", "तिजोरी (खजिना इमारत)" व "कमल महल" आहे. कमल महल हि छान प्रकारे गिलावा दिलेली व नक्षीकाम असलेली हम्पी मधील प्रसिद्ध अवषेशापैकी एक. हे सर सर्व पाहून जणांन कुंपणाचा पूर्वेकडील (मागील) लहान प्रवेशद्वार मधून बाहेर आलो.
|
"पहारा देण्याचे मिनार" |
|
"कमल महल" |
"हत्ती तबेला"
जनांन कुंपण जवळच "हत्ती तबेला (गज शाळा)" आहे, तेथे एकूण शेजारी शेजारी असे एकूण ११ कक्ष बांधलेले पाहिले प्रत्येक कक्षाचा वरती गोलाकार, घुमटाकार घुमट बांधलेले पहिले तर हत्ती तबेलाचा मध्यभागी छातीवरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हत्ती तबेलाचा एका बाजूला "रक्षक गृह" आहे हि इमारत आयताकृती रचनेची आहे व त्याला उंच कामानयुक्त प्रवेशद्वार आहे तर उंच व्हरांडा आहे.
हत्ती तबेलाचा मागे असलेले "विष्णू मंदिर", "पार्श्वनाथ जिनालाय" व बाजूला असलेले "रंगा मंदिर" पाहिले या मंदिर मध्ये एक मोठा दगडावरती असलेला हनुमान व त्या समोर एका दगडा वरती असलेला शिलालेख पाहून जनांन कुंपण मध्ये आलो व तेथून बाहेर पार्किंग जवळ आलो. तेथे "पुरातत्व विभागाचे संग्रहालय" आहे त्या संग्रहालया मध्ये उत्खनामध्ये सापडलेल्या अवशेष ठेवलेले पाहिले.
|
"हत्ती तबेला (गज शाळा)" |
|
"रक्षक गृह" |
|
"रंगा मंदिर" |
"हजार रामचंद्र मंदिर"
तेथून पुढे मी "हजार रामचंद्र मंदिर" येथे आलो हे मंदिर हरिहर यांचा राजवाड्याला जोडून आहे, मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत तर या मंदिराचा आतून व बाहेरून देखील मोठा प्रमाण मध्ये भिंती वरती रामायणातील प्रसंगाचे चित्रण (नक्षी काम) कोरलेले पाहायला मिळाले, सर्वात जास्त प्रसंगाचे चित्रण केलेले हे हम्पी मधील मंदिर आहे. मंदिराचा आत मध्ये चार पॉलिश केलेल्या काळ्या दगडांचे स्तंभ आहेत व त्या वरती देखील सुंदर असे चित्रण केलेले पाहिले. हजार रामचंद्र मंदिरा समोर "पान सुपारी बाझार", "पुष्करणी"
व इतर अवशेष पाहून पुढे निघालो.
|
"हजार रामचंद्र मंदिर" |
|
"हजार रामचंद्र मंदिर" |
|
"हजार रामचंद्र मंदिर" |
"शाही केंद्र (Royal Center) / किल्ला
"
हजार रामचंद्र मंदिरा पासून थोडे पुढे आलो व शाही केंद्र फिरायला सुरवात केली "राजाचा प्रेक्षक हॉल", "भूमिगत गुप्त कक्ष" पाहून
"महानवमी दिब्बा" येथे आलो हा एक मोठा चौथरा / मंच आहे त्याला समोरून व मागून चढण्यासाठी पायऱ्या आहेत, महानवमी दिब्बाचा रचनेला काही बाजूने शिल्पे कोरलेली आहेत. तेथे बाजूला असलेल्या "काळ्या दगडांमधील प्रमाणबद्ध पायऱ्यांची पुष्कर्णी" पाहिली हे देखील हंपी मधील आकर्षणाचे ठिकाण तेथे पूर्वीचा काळातील दगडांची पाईप लाईन पाहिली व त्या समोरील "सार्वजनिक स्नानगृह" व इतर अवशेष पाहून बाहेर आलो. बाजूला असलेला एका "अखंड दगडामध्ये बनवलेला दरवाजा" पाहिला व पुढे निघण्यापूर्वी तेथे असलेल्या मार्गदर्शक (guide) कडून पुढील थोडी माहिती घेतली.
|
"भूमिगत गुप्त कक्ष" |
|
"महानवमी दिब्बा |
|
"पुष्कर्णी" |
|
"सार्वजनिक स्नानगृह" |
|
"अखंड दगडामध्ये बनवलेला दरवाजा" |
शाही केंद्रा पुढे राणीचा स्नानगृहा पूर्वी डाव्या बाजूला दिसत असलेल्या मंदिर कडे निघालो त्यापूर्वी वाटेमध्ये "गुफा मंदिर" असा दिशादर्शक होता तिकडे निघालो तेथे दगडामध्ये गुफा निर्माण केलेल्या पाहिल्या तेथून माघारी "सरस्वस्ती मंदिर" जवळ आलो याचा गर्भगृहा मध्ये मुख्य छताला कळसाचा ठिकाणी छिद्र आहे. तेथून पुढे "अष्टकोनी स्नानगृह" पाहिले मग माघारी "चंद्रशेखर मंदिर" जवळ आलो या मंदिरामध्ये ०२ गर्भगृह पाहायला मिळाले तर मंदिर संरक्षक भिंतीने बंधिस्त आहे व या मंदिराचे गोपुर देखील तितकेच भव्य आहे. हे मंदिर पाहून मी मुख्य कमलापूर कडे जाणाऱ्या रस्ता वरती आलो व तेथून माघारी "राणीचे स्नानगृह" पहिला आलो हे देखील हम्पी मधील आकर्षणांपैकी एक. हे स्नानगृह बाहेरून नक्षीविरहित गिलाव्याचे आहे तर आत मध्ये नक्षीदार खिडक्या आहेत. चारी बाजूने कॉरिडॉर आहे व कॉरिडॉर मध्ये एकूण १६ गोलाकार घुमट आहेत व प्रत्येक घुमट मध्ये वेग वेगळे नक्षीकाम केलेले पहायला मिळाले. एका बाजूने विहरीत उतरायला पायऱ्या आहेत व जुन्या काळी येथे पाणी आणण्यासाठीची दगडी पाईप लाईन पाहायला मिळाली. अशा प्रकारे "शाही केंद्र (Royal
Center)" ची भटकंती संपून मी पुढे कमलापूरचा दिशेने निघालो.
|
"गुफा मंदिर" |
|
"सरस्वस्ती मंदिर" |
|
"अष्टकोनी स्नानगृह" |
|
"चंद्रशेखर मंदिर" |
|
"राणीचे स्नानगृह" |
|
"राणीचे स्नानगृह" |
"कमलापूर"
कमलापूर मध्ये हम्पीचे पुरातत्व विभागाचे संग्रहालय आहे तेथे आलो पण ते संग्रहालय शुक्रवार असल्या कारणाने बंद होते, तेथून पुढे मी "पट्टाभिराम मंदिर" पाहायला आलो हे मंदिर खूप मोठे आहे. पूर्व दिशेला भव्य असे गोपुर आहे. मंदिर समोर मोठा मंडप आहे. मंडपाचा खांब वरती शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराला स्वरक्षण भिंत आहे. बाजूला नक्षीकाम व शिल्पे कोरलेला कल्याण मंडप आहे हे सर्व पाहून मी कमालपूरचा मुख्य चौक येथील हॉटेल साई येथे दुपारचे विशेष असे दक्षिण भारतीय पद्धतीचे जेवण केले व थोडे थांबून कमालापूर ते श्री विजया विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रोड ने पुढे निघालो.
उजव्या बाजूला थोडे आत मध्ये गणगित्ती जैन मंदिराचा मागे असलेले "भीमाचे प्रवेशद्वार" पाहिले प्रवेशद्वाराव समोर एका दगड वरती भीमाचे शिल्प कोरलेले आहे शिल्पामध्ये भीमाने एका हात मध्ये फुल व एका हातात गदा पकडलेली आहे. तसेच एका भिंती वरती दुष्यासनाची हत्या करणारे दोन शिल्प कोरलेले आहेत. ते पाहून बाहेर आलो व रोडला लागून असलेले "गणगित्ती जैन मंदिर" पाहिले व पुढे माल्यावंत पर्वताकडे निघालो.
|
"पट्टाभिराम मंदिर" |
|
"भीमाचे प्रवेशद्वार" |
|
"भीमाचे प्रवेशद्वार" |
|
"गणगित्ती जैन मंदिर" |
"माल्यावंत पर्वत व रघुनाथस्वामी मंदिर"
काही अंतर सायकल चालून एक फाटा वरती आलो तेथून डाव्या बाजूला विठ्ठल मंदिर व उजव्या बाजूला माल्यावंत पर्वत आहे मी पर्वताचा दिशेने निघालो, पर्वताचा पायथ्याला एक लहान "गणेश मंदिर व अंजनेयाचे मंदिर" आहे तेथे नमस्कार केला व डाव्या बाजूला असलेल्या कमानी मधून पुढे पर्वत चढून आलो. पर्वता वरती "रघुनाथस्वामी मंदिर" मध्ये आलो हे देखील एक भव्य मंदिर आहे. मंदिरातील गर्भगृहा मध्ये काळ्या पाषाणातील राम, लक्ष्मण, सीता व हनुमानाचे मूर्ती आहेत. मंदिराला पूर्व व दक्षिण अशा दोन बाजूला मोठे गोपुर आहेत. मंदिराला स्वरक्षण भिंत आहे. मंदिराचा बाजूला नक्षीदार शिल्प कोरलेला स्तंभांचा कल्याण मंडप आहे.मंदिराचा बाजूला एक विहीर आहे. मंदिरालाचा मागील बाजूला लहान दरवाजा आहे तेथून मी बाहेर आलो तेथे एक दगडांचा गुहे मध्ये नंदी व शिवलिंगाचे मंदिर आहे. त्या मंदिराचा बाजूला दगडावरती भेग आहे या भेगेचा दोन्ही बाजूला दगडावरती शिवलिंग व नंदी कोरलेले आहेत. हे पाहून मी रघुनाथस्वामी मंदिरा मधून बाहेर आलो. मंदिराचा वरील दिशेला गुहे मध्ये असलेले अंजनेयाची मूर्ती पाहिली या मंदिराचा समोर दगडामध्ये कोरलेला गणपती आहे तेथून समोर वरील दिशेला आलो तेथे एक पडक्या अवस्तेथील मंदिर आहे तेथून हम्पीचा चौहू बाजूचा पूर्ण प्रदेश निहालून खाली उतरून आलो व सायकल चालवत हम्पीचा दिशेने निघालो व ०४:३० वाजता येऊन पोहचलो. सकाळीच बॅग आवरून ठेवलेल्या होत्या त्या घेऊन दुसरे हॉटेल "गणेश होमी स्टे" मध्ये रूम वरती येऊन पोहचलो. त्यानंतर तासभर विश्रांती घेतली व फ्रेश होऊन हेमकूटा पर्वतावरती सूर्यास्थ पाहायला आलो. त्या नंतर हॉटेल चिल्ल आऊट येथे रात्रीचे जेवण केले व ०४ था दिवसाचे नियोजन आखले.
|
"माल्यावंत पर्वत" |
|
"माल्यावंत पर्वत व रघुनाथस्वामी मंदिर" |
दिवस चौथा शनिवार २० जानेवारी २०२४
सकाळी लवकर आवरले व बॅग रूम मालकांकडे ठेवली व तेथून नदी मध्ये पाणी कमी असल्याने पायी नदी ओलांडून पलीकडे "किष्किंदा नगरी" पाहण्यासाठी
निघालो. नदी पार करून चाल येत होतो तितक्यात मला पहिली मोटारसायकल घेऊन येणारा तेथील व्यक्ती भेटला त्याची मोटारसायकल मी भाड्याने घेतली व पुढे निघालो. थोडा कच्चा रस्ता संपून मी सोनापूर ते अनेगुंदी रोड वरती आलो तेथून पूर्वेकडे "अंजनाद्री पर्वत" पाहायला आलो, हे हनुमानाचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे टेकडी वरती जाण्यासाठी ५००-६०० पायऱ्या चढून आलो टेकडी वरती हनुमानाचे मंदिर व एक लहान पाण्याचे टाके पाहिले व खाली उतरून आलो व नाश्ता करून पुढे "पंपा सरोवर" येथे आलो. हे पंपा सरोवर भारतातील ०५ मुख्य सरोवरांपैकी एक, तेथे असलेले "श्री महालक्ष्मी देवी मंदिर" आणि नंदी, शिवलिंग व इतर देवांचे मूर्ती असलेल्या मंदिर मध्ये दर्शन घेतले व पुढे निघालो.
पंपा सरोवर पासून आनेगुंदी कडे जाणाऱ्या रोड वरती उजव्या बाजूला असलेले "वाली किल्ला" / "दुर्गा किल्ला ( अनेगुंदी किल्ला)" वरील "दुर्गा देवी मंदिर" पाहिले व अनेगुंदी गावाकडे आलो. गावाचा प्रवेशद्वार मधून समोर आलो व "रंगनाथ मंदिर" मध्ये दर्शन घेतले मंदिरा मध्ये काळ्या पाषाणामधील विष्णूंची अनंतासनातील मूर्ती आहे मंदिर पूर्वीचेच आहे पण आता कलर दिलेला आहे. मंदिरा समोरील "गगन महालचे" अवशेष पाहून नदीकाठी असलेला "६५ स्तंभांचा मंडप" पाहिला व "चिंतामणी मंदिर" परिसर पाहायला आलो. मंदिराचा आत मध्ये शिरताच एक लहान मंदिर व त्या समोर दुमजली मंदिर पाहिले या मंदिरा मध्ये शिवलिंग, गणेश, इतर देवतांची मूर्ती पाहिली व बाजूला असलेल्या "लक्ष्मी नरसिंह" मंदिराचे दर्शन घेतले व इतर अवशेष पाहून बाहेर माघारी फिरलो व हम्पी कडे जाण्यासाठी निघालो हे सर्व १०:३० वाजेपर्यंत पाहून झाले. मग मी तेथूनच मोबाइल वरून दुपारचा परतीचा प्रवासाचे रेल्वेचे तिकीट काढले. पुढे नदी काठी मोटारसायकल जमा करून नदी पार केली व ११:०० वाजता हम्पीला येऊन पोहचलो, रूम मालकांकडून बॅग घेतली व त्यांचाच घराचा वरती असलेल्या "गणेश रूप टॉप" येथे फ्रेश होऊन हम्पीचा भटकंतीचा प्रवास संपवला व हम्पी ते होस्पेट बस पकडली व तेथून पुढे दुपारी ०१:४० ची होस्पेट ते पुणे रेल्वे प्रवास करत २२-०१-२०२४ रविवारी पहाटे ०२:०० वाजता घरी येऊन पोहचलो.
|
"अंजनाद्री पर्वत" |
|
"अंजनाद्री पर्वत" |
|
"अंजनाद्री पर्वत" |
|
"पंपा सरोवर" |
|
"दुर्गा देवी मंदिर" |
|
"रंगनाथ मंदिर" |
|
"गगन महाल" |
|
"६५ स्तंभांचा मंडप" |
|
"चिंतामणी मंदिर परिसर" |
|
"चिंतामणी मंदिर" |
|
"लक्ष्मी नरसिंह" |
©सुशील राजगोळकर
No comments:
Post a Comment