धोडप | Dhodap १४-जानेवारी-२०२४

फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब चिंचवड यांचा ७९ वा ट्रेक आयोजना प्रमाणे नाशिक ज़िल्हा व चांदवड तालुक्यामध्ये असलेला महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमकांचा सर्वात उंच "धोडप" किल्ला पाहायला शनिवार १३-जानेवारी-२०२४ रोजी पिंपरी चिंचवड मधून ६ वर्षाच्या मुलापासून ७० वर्षांपर्यंतचे असे एकूण ५० मेंबर्स ना घेऊन रात्रीचे १०:३० वाजता गाडी निघाली 🚌.
रविवारी पहाटे ०५:३० वाजता किल्याचा पायथ्याला असलेल्या हट्टी (धोडप) या गावी पोहचलो. तेथे असलेल्या अमित परदेशी (+919579439526) यांचा घरी फ्रेश होऊन नाश्ता केला व त्यांचे वडील आमचा सोबत वाटाड्या म्हणून घेतले व ०७:०० वाजता ट्रेक लिडरनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शन ऐकून किल्याचा दिशेने चालायला सुरवात केली 🌅.
गावातील जिल्ह्या परिषद शाळेचा बाजूने व हट्टी पर्यटन केंद्र (धोडप) येथून जाणाऱ्या वाटेवरती असलेले २ पाझर तलाव उजव्या हाताला ठेऊन तलावाचा बांधा वरून चालत होतो समोर शिवलिंग सारखा धोडप किल्ला ⛰️ दिसत होता तर किल्याचा मधोमध एक नैसर्गिक दोन डोंगरांना विभक्त करणारी दगडाची खाच खुणाऊ लागली. पुढे थोड्याच अंतरावर असलेल्या पहिला हनुमान मंदिरा पाशी येऊन पोहचलो. तेथे नमस्कार केला व पुढे जंगलातुन जाणारी चढाईची वाट चालायला सुरवात केली. 

हट्टी गावचा तलावा जवळवून दिसणारा धोडप किल्ला

हट्टी गावचा तलावा जवळवून दिसणारा धोडप किल्ला 


धोडप किल्लाचा वाटेवरील हनुमान मंदिर
धोडप किल्लाचा वाटेवरील हनुमान मंदिर

हनुमान मंदिर पासून थोडे अंतर चालून येता एक डाव्या हाताला वाट जात होती ती अवघड व किल्यावरील शिव मंदिरा कडे जाते आम्ही सरळ वाटेने किल्ल्याचा माचीवरती येऊन पोहचलो. माचीवरती थोडे पूर्व दिशेला जाऊन तलाव पाहिला व तलावाचा पुढे असलेला बुरुज पाहीला या बुरुजावरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत हा बुरुज भक्कम व सुस्थितीत आहे तेथुन माघारी किल्ल्याचा दिशेने निघालो. पहिला दरवाजाचा थोडे आधी एक हनुमान मंदिर पाहिले व दरवाजा पाशी आलो, दरवाजाची एका बाजूची भिंत कोसळलेली आहे व दरवाचा उजव्या खांबावरती मराठी मध्ये कोरलेला एक शिलालेख पाहायला मिळाला. दरवाजातून आत मध्ये थोडे अंतर पुढे चालत येता तेथे एक थोडी बुजलेली विहीर पाहिली तेथेच थोडे पुढे आणखीन एक हनुमान मंदिर पाहायला मिळाले. मंदिराचा बाजूला लहान दुरावस्थेतील शिवलिंग व नंदी आहे. पुढे गडावरील गावकऱ्यांची घरे होती त्यांची घरे पाहता असे वाटले कि हि खूप जुनी घरे आहेत. तेथून पुढे दोन वाटा जात होत्या एक उजव्या हाताला बालेकिल्यावरती व डाव्या बाजूला खालील दिशेला मंदिरांकडे.

माचीवरील तलावा समोरील / राजमार्गा वरील बुरुज
माचीवरील तलावा समोरील / राजमार्गा वरील बुरुज 

माचीवरील पहिला दरवाजा - धोडप किल्ला
माचीवरील पहिला दरवाजा - धोडप किल्ला

माचीवरील गावकऱ्यांची घरे - धोडप किल्ला
माचीवरील गावकऱ्यांची घरे - धोडप किल्ला

आम्ही पहिला डाव्या बाजूला मंदिरांचा दिशेने निघालो थोडे अंतर चालून पुढे आलो समोर एक गणपतीचे मंदिर पाहिले 🛕 मंदिरा मध्ये एक शिवलिंग देखील आहे. बाजूला असलेले पाण्याचे टाके व पूर्ण पणे पडझड झालेले शिव मंदिराचे अवशेष पाहिले मंदिरा समोरील नंदी हा लहानशा घुमटी मध्ये आहे त्या मंदिराचे उघड्यावरील सुंदर असे शिवलिंग पाहून पुढे जीर्णोद्धार केलेले शिव मंदिर व त्या मागील लहानशी विहीर पाहिली. मंदिरा समोरील असलेल्या झाडाखाली दगडातील नंदी, पादुका, शिवलिंग व आजू बाजूला असलेले इतर अवशेष पाहून माघारी फिरलो व जेथून बालेकिल्याला वाट जाते तेथे आलो. (शिव मंदिरा मागून एक वाट पश्चिम दिशेला असलेल्या दरवाजा व रावल्या - जावळ्या गडाकडे जाते.) 

उध्वस्त शिवमंदिरातील शिवलिंग - धोडप किल्ला
उध्वस्त शिवमंदिरातील शिवलिंग - धोडप किल्ला

गणपती मंदिर व मागे बाल्ले किल्ला - धोडप किल्ला
गणपती मंदिर व मागे बाल्ले किल्ला - धोडप किल्ला

जीर्णोद्धार केलेले शिव मंदिर - धोडप किल्ला
जीर्णोद्धार केलेले शिव मंदिर - धोडप किल्ला

पुढे बाल्ले किल्ल्याचा दिशेने चालायला सुरवात करता समोर एक बांधून घेतलेली दुमजली बारव / विहीर 🏟️ पाहायला मिळाली. किल्यावरती चढाईची वाट दगड लावून / फरसबंदीची बनवलेली आहे.  पुढे वरील दिशेने काही अंतर चालून येता आता नव्याने बसवलेल्या लोखंडी शिडी मार्गा जवळ येऊन पोहचलो. पुढे एक पडक्या अवस्थेत असलेला दरवाजा लागला मात्र दरवाजाच्या देवड्या सुस्थितीत पहायला मिळाल्या तो दरवाजा पारकरून आत मध्ये येता डाव्या बाजूला कातळा वरती खोदून बनवलेले पाण्याचे टाके व टाक्याचा एका बाजूला कातळामध्ये कोरलेला हनुमान तर दुसऱ्या बाजूला कोरलेला गणपती व देवीची मूर्ती पाहिली. या दरवाजाच्या उजव्या बाजूला सुस्थितीत असलेला सुंदर बुरुज पाहायला मिळाला.
दुमजली बारव / विहीर - धोडप किल्ला
दुमजली बारव / विहीर - धोडप किल्ला

दुमजली बारव / विहीर - धोडप किल्ला
दुमजली बारव / विहीर - धोडप किल्ला

बुरुजामध्ये असलेला दुसरा दरवाजा - धोडप किल्ला
बुरुजामध्ये असलेला दुसरा दरवाजा - धोडप किल्ला

दुसरा दरवाजाचा मागे डाव्या बाजूला कातळावरती असलेले गणपती व देवी - धोडप किल्ला
दुसरा दरवाजाचा मागे डाव्या बाजूला कातळावरती असलेले गणपती व देवी - धोडप किल्ला

तेथून थोडे पुढे चालत आलो तेथे Z आकार मध्ये कातळा मध्ये खोदून बनवलेल्या पायऱ्या लागल्या त्या पायऱ्या चढतांना एका बाजूला कातळमधील भिंती वरती शिलालेख कोरलेला पाहिला व पुढे त्याच कातळा मधील कोरीव दरवाजा पार करून पुढे आलो. या दरवाजाच्या मागे देवड्या व दरवाजाचा बुरुजावरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. समोर कातळा मधील आणखीन काही पायऱ्या चढुन बालेकिल्ला वरती येऊन पोहचलो. समोर पडझड झालेले वाडे व पाण्याचा टाक्या व त्या मागे नजरे समोर धोडप किल्याचा सुळका उभा आहे असे वाटले. तेथील एका वाड्याची एक खोली सुस्थितीत आहे. तेथील अवशेष पाहून सुळक्याचा समोर येऊन पोहचलो. तेथून एक गुहा सुळक्याचा मध्ये दिसत होती पण आम्ही येतांना पाहायचे असे ठरवून डाव्या बाजूने पुढे चालायला लागलो सुळक्याचा पोटामध्ये एका पुढे एक असलेल्या खूप गुहा व कोठारे पाहत मुख्य गुहे पाशी आलो. हि एक गडावरील सर्वात मोठी गुहा आहे या गुहे मध्ये देवीचे मंदिर पाहिले मंदिराचा बाजूला बाहेरील दिशेला नितळ स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे टाके आहे त्यातील पाणी पिऊन व बॉटल मध्ये भरून घेतले व पुढे निघालो. आता ओढ होती ती म्हणजे खालून दोन डोंगरांना विभक्त केलेली नैसर्गिक खाच पाहण्याची तेथे येऊन पोहचलो. दुरून लहान दिसत असलेली ही खाच खुप मोठी आहे. तेथून आजू बाजूचा पूर्ण प्रदेश न्याहाळून घेतला. 

कातळ खोदीव पायऱ्या - धोडप किल्ला
कातळ खोदीव पायऱ्या - धोडप किल्ला

कातळ खोदीव पायऱ्याचा वाटेवरील शिलालेख - धोडप किल्ला
कातळ खोदीव पायऱ्याचा वाटेवरील शिलालेख - धोडप किल्ला

बाल्ले किल्यावरील वाड्यांचे अवशेष व मागे सुळका - धोडप किल्ला
बाल्ले किल्यावरील वाड्यांचे अवशेष व मागे सुळका - धोडप किल्ला

सुळकाचा पोटामधील गुहा व कोठारे - धोडप किल्ला
सुळकाचा पोटामधील गुहा व कोठारे - धोडप किल्ला

गुहेतील देवीचे मंदिर - धोडप किल्ला
गुहेतील देवीचे मंदिर - धोडप किल्ला

बाल्ले किल्ल्यावरून पश्चिम दिशेला रावळ्या - जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी गड तर उत्तरेला साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मांगी - तुंगी दिसत होते. तेथून माघारी आलो व सुळक्याला पूर्ण प्रदक्षिणा मारायची ठरवले व ज्या दिशेने आलो तेथून माघारी न जाता विरुद्ध दिशेने चालून आलो हि वाट थोडी झाडा झुडपांची व घसरडी आहे ती वाट आम्ही प्रदक्षिणा पूर्ण करून येतांना पाहिलेल्या गुहे पाशी आलो. तेथे जाणे थोडे अवघड आहे हि गुहा जेम तेम २.५ ते ३ फूट उंच व दोन खांब राखून बनवलेली आहे. तेथून समोरचा प्रदेश निहाळतांना दूरवर इखारा डोंगराचा इथे भगवा रंग दिलेले मंदिर‌ उठुन दिसले. आम्ही वाटाड्या काकांना या मंदिरा बदल विचारले, हे गोरक्षनाथ महाराजांचा मठ आहे असे सांगितले. आम्ही तेथेच निश्चय केला जर इथे आलो आहोत तर हे मंदिर पाहून जायचे.


गुहा - धोडप किल्ला
गुहा - धोडप किल्ला



पुढे आमच्याकडे वेळ देखील होता व धोडप किल्याची गडफेरी देखील पूर्ण झाली होती. त्यामुळॆ आम्ही थोडे लगबगीने बालेकिल्ला उतरून माची वरती आलो. व माचीवरील पूर्व दिशेला असलेला तलाव व बुरुज ओलांडून धोडप किल्ला व इखारा सुळकाचा मध्ये असलेल्या डोंगराचा (बंड्या डोंगराचा) डाव्या दिशेने (उत्तर) पंचवीसएक मिनिटामध्ये चालत गोरक्षनाथ मंदिरा मध्ये येऊन पोहचलो तेथे दोन मंदिरे, विहीर, विश्रामगृह बांधलेले आहे. तेथे असलेल्या मंदिरामध्ये दर्शन घेतले व थोडी विश्रांती घेऊन पुढे बंड्या डोंगराचा दुसऱ्या दिशेने डोंगराचा फेरा संपवून धोडप किल्ल्याकडे आलो व समोर झाडा झुडपा मध्ये असलेला धोडप किल्याचा मुख्य दरवाजा दूरवरून दिसत होता तेथूनच असलेल्या घळीतून आम्ही गड उतरायला घेतला. ज्या मार्गाने आम्ही गड उतरत होतो हा गडाचा मुख्य राजमार्ग आहे. मार्गामध्ये काही अवशेष पाहायला मिळाले.
वाटेवरती सपाटीला एक हनुमान मंदिर पाहायला मिळाले व पुढे आम्ही तलावाचा समोर येऊन पाहोचलो व तेथून बांधाऱ्यावरून सकाळी आलो त्या मार्गाला येऊन पोहचलो व ०३:३० वाजता परदेशी काकांचा घरी येऊन जेवणावरती 🍱 ताव मारला व हट्टी गावातील प्रसिद्ध असलेला खवा सर्वांनी घेतला व परतीच्या मार्गाला लागलो व रात्री ११:३० वाजता पिंपरी चिंचवडला येऊन पोहचलो.


इखारा सुळख्याचा माचीवरील गोरक्षनाथ मंदिर
इखारा सुळख्याचा माचीवरील गोरक्षनाथ मंदिर

इखारा सुळख्याचा माचीवरील गोरक्षनाथ मंदिर व मागे इखारा सुळखा
इखारा सुळख्याचा माचीवरील गोरक्षनाथ मंदिर व मागे इखारा सुळखा


राजमार्गा वरील हनुमान मंदिर - धोडप किल्ला
राजमार्गा वरील हनुमान मंदिर - धोडप किल्ला

©सुशील राजगोळकर

No comments:

Post a Comment

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.