🧗🏼♀️जुन्नर विभाग मोहीम २१ ते २३ नोव्हेंबर-२०२० भटकंती व प्रवास वर्णन🧗🏼♂️
शनिवार दिनांक २१-नोव्हेंबर-२०२० रोजी सकाळी ०५:०० वाजता मी रावेत पुणे वरून एकटाच गाडी घेऊन निघालो. मुंबई वरून आनंद सर, पॉल पेंटर सर, अरुण गवेकर व अजित येणार होते. जुन्नर मध्ये पोहचल्या नंतर मी अजितला संपर्क केला असता ते मुरबाडला पोहचले होते. ते बोले तू पारगाव फाटा यथे येऊन थांब, मी ०९:०० वाजता पोहचलो तसेच ते १०:०० वाजता पारगाव फाटा येथे आले. तेथूनच आमची - १ कार गाडी , १ मोटार सायकल️ व ५ सदस्यांची🧍🏼♂️, ३ दिवसाची "जुन्नर" विभागाची भटकंती चालू झाली.
|
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक जुन्नर |
शिंदोळा ⛰️
पारगाव फाटावरून जवळच असलेला शिंदोळा किल्ला पहिला पाहूनच पुढे जायचे, असे ठरवून आम्ही निघालो.
बगडवाडी पारगाव तर्फ मढ येथे आमचा गाड्या लावून ११:०० वाजता २ ते ३ तास मध्ये खाली येऊ असे ठरवून आम्ही असलेले जेवण व सुरक्षेचे साहित्य वगैरे न घेता गडाचा दिशेने निघालो. तसेहि हा गड जरा दुर्लक्षित व अपरिचितच. या गडाची सहज अशी माहिती उपलब्ध नाही. गडावरती सहसा कोणी जात नासावेत म्हणून गडाला जाणारी वाट पटकन सापडत नाही. गावातील लोकांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही घळीचा वाटेणे गड चढून गेलो. पण तो गडावरती जाण्याचा मुख्य मार्ग नाही. काही ठिकाणी थोडी अवघड व धोकादायक वाट आहे. त्या वाटेने आम्ही गडावरती पोहचलो.
गडाचा मुख्य दरवाजाची पडझड झालेली आहे. तेथेच दगडामध्ये कोरलेला गणपती आहे तेथे दर्शन घेऊन तेथून आम्ही गडा वरती फेरी मारली. गडावरती पाण्याच्या टाक्या वैतिरिक्त पाहायला काही भेटले नाही. पण गडावरून माळशेज, MTDC माळशेज घाट, पारगाव चा परिसर, हरिश्चंद्रगड, निमगिरी/हनुमंतगड, पिंपळगाव जोग धरण, असा पूर्ण परिसर मात्र शिंदोळा गडावरून पाहिला. दुपारचे कडक ऊन होते त्यातून सर्व जण थकले होते. पाणी सुद्धा संपले होते, पण सर्वाना तहान तर खूप लागली होती. आम्ही ज्या अवघड वाटेने गडावरती आलो त्या वैतिरिक्त गड उतरताना मात्र एक थोडी मळलेली वाट सापडली. त्या वाटेने खाली जायचे ठरउन आम्ही गड उतरायला सुरवात केली.
रखरखते ऊन लागत होते. वाटे मध्ये एक दोन ठिकाणी दगडामध्ये कोरलेल्या लहानश्या पायऱ्या लागल्या. गडाचा एका आड वाटेला एक कपारी दिसली, तेथे मानव निर्मित लहानशी गुहा व लहानसा पाण्याचा झरा सापडला. मग मात्र आम्ही आमची तहान भागवली व पुढे चालून गेलो. हि वाट तशी सोपी होती पण खूप वळसा मारून खूप लांब पल्याची होती. त्यामुळे खूप वेळ झाला होता. गडाचा उंचीचा वाटेवरून येतांना आम्हाला एक तलाव दिसत होता. ती जंगलाची वाट संपवून आम्ही त्या तलावा पाशी पोहचलो. तेथुंन पुढे शेतातील वाटेने आम्ही ०४:०० वाजता बगडवाडी येथे पोहचलो व निमगिरी कडे निघालो. जरी या दुर्लक्षित किल्ला वरती जास्त कोणी येत नसले तरी आम्हा भटक्यानं साठी हा एक चांगलाच पर्वणी, अनुभव, आठवण देणारा ट्रेक ठरला.
निमगिरी मध्ये ०५:०० वाजता पोहचलो व एका बोरवेल वरती पाणी भरून घेतले. व गावा पासून थोड्या लांब अंतरावरती रस्त्याचा बाजूला असलेल्या शेतामध्ये आमचा बसतांड मांडला. लगेचच कार मधील साहित्य काडून पहिला चहा टाकला . व खूप भूक लागली असल्याने जे थोडेफार जेवण घेऊन आलो होतो ते खाल्ले. त्या नंतर आम्ही चहा घेत तंबू/टेन्ट ठोकले व जेवण बनऊन गप्पा गोष्टी करत रात्र जागवली.
|
शिंदोळा गडावरील पाण्याचा टाक्या |
|
शिंदोळा गडावरील पाण्याचा टाक्या |
|
शिंदोळा गडावरून दिसणारा परिसर |
|
बगडवाडी गावाचा वाटेवरून जाताना दिसणारा शिंदोळा किल्ला |
|
शिंदोळा गडाच्या मुख्य दरवाजा इथे दगडामध्ये कोरलेला गणपती |
|
शिंदोळा गडावरील कोरडे पाण्याचे टाके |
|
शिंदोळा गडाच्या आडवाटेवर असलेला पाण्याचा झरा |
|
बगडवाडी गावाचा तलाव व मागे शिंदोळा किल्ला |
⛰️ निमगिरी व हनुमंतगड⛰️
निमगिरी ⛰️
दिवस दुसरा रविवार दिनांक २२-नोव्हेंबर-२०२० रोजी सकाळी ०५:०० वाजता उठून कॉफी बनवली व आंधार असल्यामुळे थोडे थांबून ०६:४५ वाजता निमगिरी व हनुमंतगडचा दिशेने चालायला सुरवात केली
🧑🦯 साधारण तासा भरामध्ये गडावरती पोहचलो. गडाची वाट तशी सोपी आहे, दोन्ही गडावरती जाण्यासाठी एकच वाट आहे कारण खालून सुद्धा हा एकच किल्ला दिसतो पण हे दोन जोड किल्ले आहेत. निमगिरी किल्ल्यावरती जाण्यासाठी प्रशस्त अश्या कातळामधील कोरीव दगडी पायऱ्या आहेत. पण काही ठिकाणी तुटलेल्या व काही ठिकाणि वरून गडाची तटबंधी पडून बुजलेल्या आहेत. आम्ही त्या पायऱ्या पाहून पुढे गेलो. मुख्य दरवाजाच्या खाना खुना आहेत पण दरवाजा अस्तित्वात नाही. दरवाजाला लागूनच एक खराब अवस्थेत पाण्याचे टाके आहे. तेथून सरळ पुढे गडावरती आम्ही चालत गेलो समोर असलेले पाण्याचे टाके, काही वाड्याचे अवशेष, देवीचे मंदिर, मंदिरामधील शिवलिंग, देवीची मूर्ती व मंदिरा समोर असलेल्या पाण्याचा टाक्या पाहून पुढे गडाच्या पूर्वेकडे असलेल्या गुहा पाहिल्या. व गडाला पूर्ण प्रदक्षिणा मारताना समोर दिसत असलेला शिंदोळा, हरिशचंद्रगड व आजू बाजूचा परिसर पाहत जेथून दोन्ही किल्ले जोडले जातात तेथे येऊन हनुमंतगडाकडे चढाई केली.
हनुमंतगड ⛰️
गडावरती जातानाच दगडामध्ये कातळ कोरीव पायऱ्या लागतात त्याचा साहाय्याने गडावरती चडून गेलो. गडावरती जाताच उजव्या हाताला समोरच एक उध्वस्त वाडा पाहायला भेटला. तेथून मागे जाऊन परत माघारी आलो व खालील दिशेला असलेल्या पाण्याचा टाक्या पाहून पुढे चालून गेलो. समोर आणखीन एक पाण्याचे टाके आहे ते पाहिले. गडावरून समोर असलेल्या निमगिरी गडाचा कातळ कोरीव पायऱ्याची वाट स्पष्ट दिसत होती. ती पाहून आम्ही दोन्ही गड उतरून ११:०० वाजता जेथे राहिलो होतो होत्या त्या ठिकाणी येऊन पोहचलो. गडावरती पॉल पेंटर सर आले नाहीत त्यामुळे त्यांनी आमचे तंबू वगैरे आवरुन ठेऊन आमचा साठी कॉफी बनवली होती. आम्ही तेथे थोडे बसून फराळ केला व पुढे हडसर कडे निघालो. दोन्ही गड पाहण्या सारखे होते त्यामुळे मण प्रसन्न झाले. व पहिल्या दिवशीचा शिंदोळा किल्ला पाहून जितका थकवा आला होता तो थोडा दूर झाला.
|
निमगिरी किल्ल्यावरील पाण्याचा टाक्या |
|
निमगिरी किल्ल्यावरील देवीचे मंदिर व शिवलिंग |
|
निमगिरी किल्ल्यावरील पाण्याचा टाक्या |
|
निमगिरी किल्ल्यावरील गुहा |
|
निमगिरी किल्ल्यावरील मुख्य दरवाजा येथील पायऱ्या |
|
निमगिरी किल्ल्यावरून मागे दिसत असलेला हनुमंतगड |
|
हनुमंतगड गडावरती जाणाऱ्या कातळा मधील पायऱ्या |
|
हनुमंतगड वरून दिसणारा निमगिरी किल्ला व कातळामधील पायऱ्यांची वाट |
|
हनुमंतगड वरील वाड्याचे अवशेष |
|
हनुमंतगड वरील पाण्याचे टाके |
|
गावामधून दिसणारा निमगिरी किल्ला व हनुमंतगड |
हडसर ⛰️
खुंटीचा वाटेने 🧗🏼♂️ जायचे आहे म्हणून आम्ही आमची गाड्या हडसर या गावी लावून भर दुपारी १२:३० वाजता ट्रेकला सुरवात केली. सर्वांनी प्रस्तारोहणाचे साहित्य, पाणी वगैरे घेऊन पठारावरून चालत निघालो. थोड्या वेळात खुंटीचा वाटे जवळ येऊन पोहचलो. त्या खुंटीचा वाटेकडे पहिले तरी मनामध्ये धडकी भरते, अशा वाटेची चढाई पहिल्यांदाच करणार होतो. भीती तर मनामध्ये खूप वाटत होती पण आता आलोय तर माघार नाही. म्हणून मन घट केले व सहकाऱ्यांचा विश्वासावरती आम्ही ती खुंटीची वाट सर केली🧗🏼♂️🧗🏼♂️. तेथे अजून काही जुन्नर विभागातील लोक त्या वाटेने चढाई करत होते त्यांना विचारणा केली असता, हि खुंटीची वाट बऱ्याच वर्षा पूर्वी गावकऱ्यांनी आपल्या सोयी साठी बनवली आहे असे समजले. आमचा पैकी आनंद सर यांनी पहिला चढाई करून आम्हा सर्वांचा सुरक्षेसाठी व चढाई सोपी व्हावी यासाठी रोप लावला. पहिली खुंटीची वाट चडून गेल्यानंतर समोरच मोठी गुहा आहे तेथून थोडेसेच पुढे जाता अजून एक गुहा पाहायला मिळाली. पण अजून गडावरती पोहचलो नाही कारण तेथून दुसरी आणखीन एक लहानशी खुंटीची वाट चालू होते. ती वाट तशी सोपी असल्या कारणाने आम्ही लवकर चढुन गेलो. तेथून गडाचा तटबंदीला लागून सरळ वाट जाते त्या वाटेने आम्ही गडावरती पोहचलो. समोर गडाचा परिसर, तलाव, पाण्याचा टाक्या, अवशेष, पाहत आम्ही महादेव मंदिरा पाशी येऊन पोहचलो. मंदिरा समोर एक मोठा नंदी आहे. मंदिराचा आत मध्ये गणपतीची मूर्ती, मारुतीचा २ मूर्ती व मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे त्यांना नमस्कार केला. व खूप भूक लागल्याने आम्ही मंदिराचा पायऱ्या वरती बसूनच भेळ बनवली🛕. मग सर्वानी मनसोक्त पणे ती फस्त केली. त्यानंतर आम्ही मंदिराचा मागे असलेला तलाव, पाण्याचे टाके पाहून राजमार्गाने गड खाली उतरायला सुरवात केली. कातळामध्ये कोरून निर्माण केलेल्या राजमार्गाचा पायऱ्या, दरवाजाचा कमानी, दरवाजा मागील दिवडी, थोडी तटबंधी असे सर्व काही अजूनही खूपच सुस्थित आहेत ते पाहुचनच मन भारावले. आम्ही त्याच पायऱ्यांचा वाटेने पेठेचावाडीला येऊन पोहचलो तो पर्यंत थोडा अंधार झाला होता. पेठेच्या वाडी वरून मग आम्ही पुन्हा हडसर पर्यंत रोडचा बाजूने चालत गेलो. सर्व जण थकल्याने आम्ही तेथेच राहायचे ठरवले. मग एका गावकऱ्याचा इथे जेवण बनवायला सांगितले व पहिला कोरा चहा देण्यास सांगितले. चहा घेऊन झाल्या नंतर तेथेच थोडे फ्रेश झालो व जेवण ️ उरकून त्यांचाच घराचा पडवी मध्ये आमचा बिछाना अंथरून झोपी गेलो.
|
पठारावरून दिसणारा हडसर किल्ला |
|
हडसर किल्लाची खुंटीची वाट |
|
हडसर किल्लाच्या महादेव मंदिरा मधील मारुती व गणपती |
|
हडसर किल्लावरील महादेव मंदिर |
|
हडसर किल्याचा कातळामधील पायऱ्या |
|
हडसर किल्याचा कातळामधील पायऱ्या
|
|
|
हडसर किल्याचा दरवाजा व मागे कातळामधील पायऱ्या |
|
हडसर किल्याचा पायऱ्याचा वाटेवरून वरून समोर दिसणारा परिसर |
|
हडसर किल्याची पायऱ्याची वाट |
|
हडसर किल्लाचा खुंटीचा वाटेवरील गुहेमधून मागे दिसणारा हटकेश्वर डोंगर |
|
हडसर किल्लाची खुंटीची वाट |
|
हडसर किल्लाची खुंटीची वाट |
|
हडसर किल्लावरील अवशेष |
|
हडसर किल्लावरील पाण्याचे टाके |
|
हडसर किल्ल्यावरून दिसणारा समोरील परिसर |
जीवधन ⛰️
दिवस तिसरा सोमवार दिनांक २३-नोव्हेंबर-२०२० रोजी सकाळी ०४:०० वाजता उठून आवरले. व जेथे राहिलो होतो त्यांना सांगितले होते त्या प्रमाणे त्यांनी मस्त पैकी ५ मोठे ग्लास भरून दूध दिले 🥛🥛. मग ते घेऊन व थोडे उजाडल्या नंतर ०६:०० वाजता आम्ही जीवधन कडे जाण्यास निघालो. रोड लगत असलेल्या वराडी डोंगराचा पायथाला आनंद सरांचा मित्र मारुतीचा घरी जाऊन चहा व नाश्ता उरकला. व दुपारचे जेवण बनवायला सांगून मित्र मारुतीला सोबत घेऊन जीवधन कडे निघालो. घाटघर इथे गाडी लावून जीवधन गडाचा जुन्नर दरवाजाने जायचे ठरून आम्ही जंगलाची वाट पायपीट करत चालायला लागलो. काही वेळात आम्ही पायऱ्यांपाशी पोहचलो. येथे देखील कातळामध्ये कोरलेल्या छान पायऱ्या होत्या व आहेत. काही ठिकाणी पायऱ्या तोडलेल्या असल्या कारणाने तेथे लोखंडी शिडी बसवलेल्या आहेत. त्याचा साहाय्याने गडावरती जाताना उजव्या बाजूला मानव निर्मित २० ते २५ फूट लांब गुहा आहे ती पाहिली. पुढे गड चठुन जाताच जुन्नर दरवाजाचे अवशेष दिसतात, दरवाजा अस्तित्वात नाही. तेथून पुढे डाव्या बाजूला एक मोठी गुहा आहे त्या गुहे मध्ये खराब पाणी आहे. तेथून पुढे गडावरती वाड्याचे अवशेष पाहून धान्य कोठार पहिले. धान्य कोठाराची रचना, त्या मधील नक्षी काम, खांबाची रचना, घुमटाची रचना, दरवाजा वरील कोरलेला सूर्य, चंद्र, आतील दरवाजाची रचना त्या वरील कलशाचे कोरीव काम, व इतर रचना वगैरे निरखून पहिले तर लक्षात येईल कि हे धान्य कोठार नसून एक मंदिर होते असावे. त्या कोठाराच्या बाजुला असलेल्या पाण्याचा टाक्या पाहून आम्ही त्याच कोठाराच्या मागील बाजूने बाल्ले किल्ल्यावरील जिवाई देवीची मूर्ती पाहिली. व मंदिरा मागील उद्वस्त वास्तू पाहून वानरलिंगी सुलखा पाहण्यासाठी खाली उतरून गेलो. तेथून पुढे थोडे उजव्या बाजूला वरती चालून जाताच वाड्याचे अवशेष पाहिले व पाण्याचा टाक्यांपाशी येऊन बसलो. तेथील नितळ थंडगार पाणी पिऊन आम्ही खाली असलेले आणखीन एक टाके पाहून गडाचा मुख्य कल्याण दरवाजा पाशी येऊन पोहचलो. तो गायमुखी दरवाजा पाहून आम्ही तिकडूनच गड उतरायला सुरवात केली. तुटलेला पायऱ्यांचा सुरवातीलाच गड प्रेमी लोकांनी दोरखंड बांधून ठेवलेला आहे. त्याचा साहाय्याने आम्ही तेथून खाली उतरलो🧗🏼♀️. इथे देखील कपारी मधील दगडी पायऱ्या पाहायला मिळाल्या काही ठिकाणी तुटलेल्या आहेत तर काही ठिकाणी एकदम सुस्तिथित आहेत त्या पाहायला मिळाल्या. व त्या घळीतून समोर दिसणारा पठार, नानांचा अंगठा, नाणेघाटाचा परिसर दिसत होता तो पाहत व मध्येच असलेली जंगल वाट व पठार पार करून २ वाजता खाली येऊन पोहचलो. जीवधन किल्ला पाहून सर्वांना खूपच बरे वाटले. मी जरा थोडेशे सर्वांचा पुठे गड उतरून आलो व तेथील गावकरांचा गाडीवरून घाटघर गाठले व माझी गाडी घेऊन आलो. व परत तेथून इतर सहकार्यांना घेऊन गेलो. तेथून मी व मारुती दोघे जण त्याचा घरी गेलो व तेथून त्यांनी दिलेले जेवण व प्रेमाचा निरोप घेऊन मी निघालो. पुढे रोड वरती सर्वजण माझी वाट पाहत होते. तेथून आम्ही थेट निघालो ते पूर या गावी असलेल्या "कुकडेश्वर" मंदिराकडे.
|
घाटघर गावातून जीवधन किल्याची पूर्वेकडील बाजू |
|
जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने जाताना लागणाऱ्या कातळामधील पायऱ्या |
|
जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने आत जाताच डावीकडे असलेले पाण्याचे टाके |
|
जीवधन किल्याचे ध्यान कोठार कि जुन्याकाळामधील मंदिर |
|
जीवधन किल्यावरील पाण्याचा टाक्या |
|
जीवधन किल्यावरील जीवाई देवीची मूर्ती |
|
जीवधन किल्यावरून दिसणारा वानरलिंगी सुळखा |
|
जीवधन किल्यावरील पाण्याचा टाक्या |
|
जीवधन किल्याचा मुख्य दरवाजा |
|
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजाला जाणारी वाट |
|
जीवधन किल्याचा वाटेवरून दिसणारा नानांचा अंघठा व नाणेघाटाचा परिसर |
|
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळामधील पायऱ्या
|
|
जीवधन किल्याचा वाटेवरून दिसणारा वानरलिंगी सुळखा |
|
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळामधील पायऱ्या
|
|
पश्चिमेकडून पठारावरून दिसणारा जीवधन किल्ला |
कुकडेश्वर 🛕
ते प्राचीन काळातील मंदिर कुकडी नदीचा उजव्या तीरावर असून पूर गावचा हद्दीत स्तिथ आहे. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ मंडप अशी असून मंदिर पश्चिमाभिमुख आहे. प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेले आढळते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही. पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे. दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागातही लक्षवेधी नक्षीकाम केलेले आढळते. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. हे शिव मंदिर पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे सुस्थितीत आहेत. मंदिरासमोरच दगडात खोदून तयार केलेला नंदी आहे. याच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेसे मंदिर आहे. त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत. मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले आहेत. खांबाच्या इतर दोन्ही बाजूस सारखेच शिल्प आहे. त्याखाली ढोल वाजवतानाच्या व्यक्तीप्रतिमांचे शिल्प आहे.
|
कुकडेश्वर मंदिर |
|
कुकडेश्वर मंदिराची समोरील बाजू |
|
कुकडेश्वर मंदिरा मधील गणपती |
|
कुकडेश्वर मंदिराचा गाभारा |
|
कुकडेश्वर मंदिराचा डाव्या बाजूसचे छोटेसे मंदिर व त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे |
तेथून पुढे आम्हाला चावंड किल्ला पाहायला जायचे होते पण घरी लवकर जाण्यासाठी व पुढील जुन्नर मोहीम साठी चावंड किल्ला शिल्लक ठेऊन आम्ही तेथून थेट घरी जायचे ठरवले. अशा प्रकारे ३ दिवसाची जुन्नर मोहीम कायम स्वरूपी आठवणी मध्ये राहील अशा आठवणींचा खजिना घेऊन आम्ही घरी निघालो. मी रात्री ०७:३० वाजता पुण्याला पोहचलो तसेच बाकी सर्व जण रात्री ०९:०० वाजता मुंबईला पोहचले.
सोबती : पॉल पेंटर, आनंद शिंदे, अरुण गवेकर, अजित गवेकर.
©सुशील राजगोळकर
वाचून असं वाटलं आम्ही पण तुमच्या सोबत गड किल्ले फिरलो छान अप्रतिम..!!जय भवानी जय शिवाजी🙏
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
DeleteGreat share!“Thank you so much for sharing all this wonderful info with us.”
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Deleteभावा एकदम मस्तच......
ReplyDelete?
Deleteधन्यवाद 🙏🏻
Nice
ReplyDelete?
Deleteधन्यवाद 🙏🏻
Apritim mitra khup chhan...khup enjoy kar Life ani amhala pan sobat ghe pudhchya trip la
ReplyDeleteGreat bhatkanti ...Go ahead